चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-दि. 31 मे 2025 रोजी पहाटेच्या सुमारास, वैराग पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करून दंगल सदृश वर्तन करणाऱ्या इसमाविरुद्ध कायदेशीर कारवाई करत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 चे कलम 85(1) आणि भारतीय न्याय संहिता, 2023 (BNS) अंतर्गत कलम 221 नुसार गुन्हा नोंदवला आहे.
गुन्हा क्रमांक 180/2025 अन्वये दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल क्र. 797 आकाश धीरसिंग पवार हे दिनांक 30 मे 2025 रोजी रात्रपाळीमध्ये वैराग शहरात डायल 112 व नाईट राउंडचे कर्तव्य बजावत होते. ते पेट्रोलिंग करत असताना, दिनांक 31 मे 2025 रोजी सकाळी 12:50 वाजता शिवाजी चौक, वैराग येथे एक इसम सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत शिवीगाळ व त्रासदायक वर्तन करत असल्याचे निदर्शनास आले.
सदर इसमाचे नाव विचारले असता त्याने आपले नाव वैभव परमेश्वर सावंत (वय 28 वर्षे, रा. विटाई अपार्टमेंट, सेक्टर 29, घनसोली, नवी मुंबई. सध्या राहणार सासुरे, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे सांगितले. त्याच्या तोंडातून उग्र मद्याचा वास येत असल्याने त्यास वैद्यकीय तपासणीसाठी वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याने मद्यपान केल्याचे प्रमाणपत्र लेखी स्वरूपात दिले.
पोलिसांनी नमूद इसमास पोलिस ठाण्यात आणल्यावर, त्याने पोलिस अंमलदारांना उद्देशून “मी सामाजिक कार्यकर्ता आहे, तुला काय अधिकार आहे? मी मोठा माणूस आहे. तुझी वर्दी उतरवीन,” असे सरकारी कर्मचाऱ्याच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करणारे व धमकीचे विधान केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकारामुळे सदर इसमाचे वर्तन सार्वजनिक शांततेस बाधक असून कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. त्याविरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात बी एन एस संहिता 2023 च्या कलम 221 (सरकारी कामकाजात अडथळा घालणे व उद्दाम वर्तन) तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 85(1) (मद्यप्राशन करून सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन) यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईसाठी पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ 1065 कंगले व डीबी पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.
सदर प्रकरणात आरोपीवर लावलेले कलमे हे शासकीय कामात अडथळा व सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध योग्य असून, गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीस दंडात्मक शिक्षा किंवा तुरुंगवास होऊ शकतो.
0 टिप्पण्या