लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड
नांदेड:-हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बुद्रुक या गावातील वार्ड क्रं 1 मधील जिल्हा परिषद शाळेच्या मागील दलित वस्ती ही गेल्या पाच वर्षांपासून विकासापासून कोसो दूर आहे. या दलित वस्तीत ना रस्ते आहेत, ना नालेसफाई, ना पाणीपुरवठा आहे. एखादे मोठे वाहन जरी या गल्लीत आले तर रस्त्यात फसून बसते. पाणी पुरवठा साठी गेल्या 8 महिन्यापेक्षा जास्त कालावधीउलटून गेला पण अजूनही पाणी पुरवठा भेटला नाही. फक्त नावाला टाकी अन टाकी ठेवण्यासाठी स्टॅन्ड आणून ठेवण्यात आला आहे. पाणी मात्र अजूनही त्या टाकीला येत नाही. या दलित वस्तीसाठी मंजूर झालेले रस्ते ग्रामपंचायत चे सदस्यच पळवापळवी करून आपापल्या वार्डात कसे नेता येतील याची स्पर्धा करत आहेत. यामुळे या दलित वस्तीत आलेला रस्ता मात्र गेल्या 6 महिन्यापासून प्रलंबित आहे.
या दलित वस्तीत रस्त्यासाठी निधी व ठराव असूनही रस्त्याचे काम सुरु केले गेलेले नाही. या वार्डातून निवडून दिलेला सदस्य हा माजी सरपंच असूनही आतापर्यंत कोणतीही सुविधा या दलित वस्तीसाठी त्यांनी पुरवली नाही.जणू काही या दलित वस्तीला वाळीत टाकले आहे असे स्पष्ट दिसून येत आहे.ज्या गुत्तेदाराला या रस्त्याचे काम दिले आहे तो आज करतो, उद्या करतो म्हणून त्याने 6 महिने असेच घातले आहेत.अनेकदा लेखी व तोंडी याबाबत पाठपुरावा केला असता दोन दिवसात सुरु करू असे गुत्तेदार सांगतो.
पण प्रत्यक्षात गेल्या पाच वर्षात या दलित वस्तीतील नागरिकांना कोणत्याही सुविधा नसल्यामुळे अत्यंत हालअपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत.नागरीक या त्रासाला आता कंटाळले असून या वार्डातील सदस्य, सरपंच यांना येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या आपला इंगा दाखवतील यात मात्र तिळमात्र शंका नाही.
0 टिप्पण्या