चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा :अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या इयत्ता पहिलीत दाखल नोंदीत व शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे फक्त जमातीचा उल्लेख करावे व जमातीपुढे हिंदू नोंद करणा-या शाळा मुख्याध्यापकांवर कारवाई करा,जिल्हा परिषद शाळा खैरवे ता.शहादा येथील मुख्याध्यापकांवर कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,सुरेश पवार,दिलीप मुसळदे, रामदास मुसळदे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग, शासन परिपत्रक क्रमांक एसटीसी १०१९/प्र.क्र ३१/का.१०,मंत्रालय विस्तार मुंबई-३२ दिनांक १२ जानेवारी २००० क्रमांक परिपत्रकानुसार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थांच्या शाळा दाखल नोंदीत व शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीसमोर हिंदू शब्दाचा उल्लेख करू नये,फक्त जमातीचा उल्लेख करावा,असे नमूद करण्यात आलेले आहे.तरी आपल्या शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खैरवे येथील मुख्याध्यापकांनी आदिवासी विद्यार्थांच्या पालकांच्या मर्जीनुसार जमातीसमोरच्या रकान्यात नोंद न करता,आपल्या स्वतःच्या मर्जीनुसार हिंदू शब्दप्रयोग करून आदिवासींना हिंदू बनविण्याचे काम करत आहेत. तरी सदर शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या नोंदी बाबत सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधित मुख्याध्यापकांवर निलंबनाची तात्काळ कारवाई करण्यात यावी.
आदिवासी या शब्दानेच हे सिद्ध होते की ,ते हिंदू नाहीत. परंतू हिंदू धर्माशी जवळीक साधल्यामुळे अज्ञानी आदिवासी समाजातील काही लोक स्वत: ला हिंदू समजून जमातीच्या नावासमोर हिंदू शब्दाचा उल्लेख करू लागले.विशेषत खान्देशातील महाराष्ट्रात हिंदू-भिल्ल,हिंदू -पावरा ,हिंदू-कोकणा,हिंदू-कोकणी, असा उल्लेख आढळून येतो.त्यानुसार तालुका मॅजिस्ट्रेट ने सुद्धा तसाच धर्माच्या उल्लेखाला प्रमाणित केलेले आहे.परंतू आदिवासींच्या घटनात्मक सूचीमध्ये अशाप्रकारे शब्दप्रयोग करण्यात आलेला नाही.म्हणून सर्वच शाळांत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या जमातीसमोर फक्त जमातीचा उल्लेख करावा ,हिंदू शब्दप्रयोग करू नयेत, याबाबत आपल्या स्तरावरुन सख्त सूचना देण्यात याव्यात.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या