कागदोपत्री रस्ता पूर्ण; मात्र रस्ता झालाच नाही!
ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची बिरसा फायटर्सची मागणी
रस्त्याअभावी ८ रूग्णांचा मृत्यू;विद्यार्थांचा नदीवरून जीवघेणा प्रवास!
चित्रा न्युज प्रतिनिधी
नंदूरबार :- ५ वर्षापूर्वी मंजूर झालेला सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत येणारा अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा ४ किलोमीटरचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करा, रस्त्याची सखोल चौकशी करून ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करून काळ्या यादीत टाका,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,प्राध्यापक सा-या पाडवी,मंगल वसावे,दिनेश वसावे,सायसिंग वसावे,रमेश वसावे,निमजी वसावे,दिल्या वसावे,शिमल्या वसावे,खुमानसिंग वसावे, केल्ला वसावे,ईश्वर वसावे,बाज्या वसावे,सत्या वसावे,प्रविण वसावे,पाश्या वसावे, गणेश वसावे,कालूसिंग वसावे,दित्या वसावे,सिंगा वसावे,भिका वसावे,सोन्या वसावे,रणजित वसावे,जयश्री वसावे,गुलाबसिंग वसावे इत्यादी ४० पेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा पर्यंतचा ४ किलोमीटरचा रस्ता राज्य शासनाच्या जिल्हा व ग्रामीण विकास योजनेतून (३०५४) मंजूर करण्यात आल्यानंतर त्यासाठी निधीही देण्यात आला आहे.परंतू मंजूरी मिळून ५ वर्षे होऊनही रस्त्याचे काम सुरूच झालेले नाही.महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा (५०५४) मार्ग व पूल( ४) जिल्हा व इतर मार्ग या योजनेंतर्गत तोलवापाडा पिंपळखुटा काकडतीपाडा रस्ता तयार करणे या कामाचे भूमिपूजन सोहळा दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी माजी आमदार तथा आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. ठेकेदार इंजि. प्रियंका जगदेवप्रसाद परदेशी वाण्याविहीर ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार यांना देण्यात आले आहे.तरी अद्याप रस्त्याचे काम झाले नाही.त्यामुळे डोंगरद-यातून व घाटातून पायीच पिंपळखुटा आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यास उशीर झाल्याने गेल्या ५ वर्षांत गर्भवती महिलांसह एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे.केवळ रस्त्या अभावी वेळेवर उपचार मिळू न शकल्याने अनेक रूग्ण दगावले आहेत, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
सातपुड्याच्या अति दुर्गम भागातील पिंपळखुटा ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या तोलवापाडा या पाड्याची लोकसंख्या एकूण ४५५ आहे.पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा या गावाचे अंतर केवळ ४ किलोमीटर आहे मात्र रस्ताच नाही.त्यामुळे २ किलोमीटरचा घाट उतरून रतवाई नदी ओलांडल्यावर पुन्हा १ किलोमीटरचा घाट चढून मुख्य रस्ता गाठावा लागतो.मोठा तोलवापाड्यातून एकुण ६० पेक्षा अधिक बालके लहान तोलवापाडा येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीत याच घाटातून येतात. त्यांच्या जीवाला याच घाटात सर्वाधिक धोका आहे.याला सर्वस्वी जबाबदार येथील लोकप्रतिनिधी व प्रशासन आहे.रस्त्याचे काम झाल्याचे बोर्ड लावण्यात आले होते,परंतू बिरसा फायटर्सने या रस्त्याची तक्रार केल्यानंतर व बातम्या आल्यानंतर रस्त्याचा बोर्डही गायब करण्यात आला आहे.रस्ता नुसता कागदोपत्रीच दाखवून ठेकेदार व माजी आमदार के .सी.पाडवी यांनी संगनमताने निधी हडप केला आहे.
0 टिप्पण्या