चित्रा न्युज प्रतिनिधी
गोंदिया— शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने तेलबिया पिकांची लागवड करण्याचे आवाहन पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक व माजी उपसभापती सुरेंद्र बिसेन यांनी केले आहे.
    तेलबियांचे उत्पादन खर्च कमी असून बाजारात या पिकांची स्थिर मागणी कायम आहे. सध्या तेलबिया पिकांना योग्य भावात खरेदी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मोवरी पिकाची लागवड करून उत्पन्नात वाढ साध्य करावी, असे त्यांनी सांगितले.
      घोटी (ता. गोरेगांव) येथे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्यात आली आहे. खरीप आणि रब्बी हंगामात शेतकरी प्रामुख्याने धानाची लागवड करतात; परंतु धान(भात) पिकासाठी लागणारा सिंचन, रासायनिक खते व औषधांचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांच्या नफ्यात घट होत आहे.
        या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी, शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावेत, या हेतूने माजी उपसभापती सुरेंद्र बिसेन यांनी घोटी येथे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित तेलबिया प्रक्रिया उद्योग सुरु केला आहे. या उद्योगात तेलबिया पासून शुद्ध खाद्यतेल तयार करण्यात येत असुन , शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य बाजारपेठ व हमीभाव उपलब्ध करून देण्याचे काम कंपनीमार्फत केले जाणार आहे.
     कंपनीमार्फत तेलबिया पिकांवरील मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येणार असून, शेतकऱ्यांना आधुनिक लागवड पद्धती, रोगनियंत्रण, बीज निवड व उत्पादन तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली जाणार आहे.
   तेलबिया पिकांमध्ये जवस, मोवरी, करडई, भुईमूंग ही प्रमुख पिके येतात. यापैकी मोवरी पिक हे कमी खर्चात, कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारे फायदेशीर पीक मानले जाते.
तेलबिया पिकांचे फायदे:
    पिकांची वाढीची मुदत कमी असल्याने अल्प कालावधीत उत्पन्न मिळते.
    या पिकांना जास्त पाण्याची आवश्यकता नसते.
     रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर कमी असल्याने लागवड खर्च कमी
व उत्पन्नात जास्त नफा मिळतो. 
     जमिनीची पोत सुधारण्यास मदत मिळते.
    वन्यप्राणी व पक्ष्यांपासून पिकाचे संरक्षण होते.
    श्री. माजी उपसभापती सुरेंद्रजी बिसेन म्हणाले की, “शासनाच्या SMART प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागात कृषी व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांबरोबरच तेलबिया पिकांची लागवड केल्यास निश्चितच उत्पन्नात वाढ होईल आणि स्वावलंबी शेतकऱ्यांचा मार्ग प्रशस्त होईल.”