सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
अहिल्यानगर :- कर्जत-जामखेड मतदारसंघात गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या 'निधी अडवणुकीच्या' आरोपांवर आता खुद्द सरकारकडूनच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. "महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार रोहित पवार यांनी मंजूर करून आणलेला विकासनिधी माजी मंत्री राम शिंदे यांनीच अडवला," या रोहित पवारांच्या साततच्या आरोपाला आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. यामुळे कर्जत-जामखेडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, विकासकामांमध्येही सूडनाट्य घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या काळातील अनेक निर्णयांना आणि निधीला स्थगिती देण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील कामांचा समावेश होता. रोहित पवार यांनी याविरोधात वारंवार आवाज उठवला होता. "मी मंजूर करून आणलेला ग्रामीण रुग्णालयाचा निधी आणि एमआयडीसीचे काम राम शिंदे यांनी सत्तेचा वापर करून अडवले," असा आरोप पवार सातत्याने करत होते. आजवर सत्ताधाऱ्यांकडून हे आरोप फेटाळले जात होते, मात्र आता एकनाथ शिंदे यांनीच या वस्तुस्थितीला दुजोरा दिल्याने राम शिंदे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
*नेमके प्रकरण काय?*
महाविकास आघाडी सरकार असताना आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सुसज्ज अशा 'ग्रामीण रुग्णालया'साठी मोठा निधी मंजूर करून आणला होता. तसेच, मतदारसंघातील बेरोजगारी कमी करण्यासाठी नवीन 'एमआयडीसी' (MIDC) देखील मंजूर करून घेतली होती. मात्र, राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना 'ब्रेक' लागला. हा निधी आणि परवानग्या राम शिंदे यांच्या सांगण्यावरून अडवण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
*राजकीय श्रेयवादाचा फटका*
रोहित पवार हे लोकनियुक्त आमदार आहेत, तर राम शिंदे हे विधान परिषदेचे आमदार आहेत. मतदारसंघात रोहित पवारांना मिळणारे यश आणि विकासकामांचे श्रेय पाहता, राम शिंदे यांनी आपली राजकीय ताकद वापरून या कामांत खोडा घातल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. रुग्णालयाचा निधी आणि एमआयडीसी रखडल्याने त्याचा थेट फटका सामान्य जनतेला आणि तरुणांना बसला आहे.
एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या या कबुलीमुळे रोहित पवार यांच्या दाव्याला बळ मिळाले असून, आगामी काळात हा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात कळीचा ठरणार असल्याचे मानले जात आहे. आता यावर राम शिंदे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या