पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार व मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती
चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड :- राज्य निवडणूक अयोगाच्या आदेशानुसार राज्यातील एकुण २९ महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला असुन त्यामध्ये नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा सुध्दा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने निर्देशीत केल्यानुसार दि.१५.१२.२०२५ पासुन पालिका हद्दीत आदर्श आचारसंहिता लागु करण्यात आली असुन याच पार्श्वभुमीवर महापालिकेत दि.१९.१२.२०२५ रोजी *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे व पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार* यांच्या प्रमुख उपस्थित बैठक घेण्यात आली, या बैठकीस सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, आचारसंहिता कक्ष प्रमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, मनपा हद्दीतील पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी निवडणूक विभागाचे *उपआयुक्त नितीन गाढवे* यांनी निवडणूकीचे टप्पे अर्थात प्रभाग रचना, आरक्षण निश्चीती, मतदार यादी, मतदार केंद्र निश्चिती, निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्ती व निवडणूक कार्यक्रम यावर प्रकाश टाकला. आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमबजावणीसाठी *उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे* यांच्या अधिपत्याखाली पालिका मुख्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापण करण्यात आला आहे त्याचप्रमाणे ७ भरारी पथके, १५ स्थिर सर्व्हेक्षण पथक व ७ व्हिडीओ सर्व्हिलियंस पथकांची स्थापणा करण्यात आली असुन या सर्व पथकांचे संचलन आचारसंहिता कक्षातुन पार पाडण्यात येणार असल्याचे यावेळी मनपा आयुक्तांनी सांगितले. त्याचप्रमाणे माध्यम क्षेत्रातील पेड न्युज इत्यादीवर नजर ठेवण्यासाठी प्रसार माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे-प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह संवेदनशील भागांसाठी विशेष व्यवस्था, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकण्याकरिता देण्यात येणाऱ्या वस्तु, मद्य, पैसा इत्यादींच्या वाटपावर अंकुश ठेवणे, रोख रक्कमांच्या ने-आणी संदर्भात लक्ष ठेवणे त्यासाठी महत्वाच्या ठिकाणी उदा. विमानतळ, रेल्वेस्टेशन, हॉटेल्स, फार्महऊस यांच्या नजर ठेवणे, बँकामार्फत, पतसंस्थेमार्फत होणाऱ्या मोठ्या व संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवणे तसेच निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे पेड न्यूज, सोशल कमेंट, सोशल मिडीया व इंटरनेट इत्यांदीवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त व पोलीस अधिक्षकांनी स्पष्ट केले.
पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी बैठकीस उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना सुचना करत आप-आपल्या क्षेत्रातील संवेदनशील मतदान केंद्र परिसरांना भेटी देऊन मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी निर्देशीत केले त्याचप्रमाणे यापूर्वीच्या कोणत्याही निवडणूकीतील कायदा व सुव्यवस्था बिघडलेल्या संवेदनशील मतदान केंद्र व सभोवतालचा परिसर यावर विशेष लक्ष देण्याचे सुध्दा आदेश देतांना कार्यक्षेत्रात गैरकायदेशीर शखे, दारु, स्फोटके याबाबत माहिती घेऊन त्यावर त्वरीत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी पोलीस अधिक्षकांनी स्पष्ट केले. एकंदरीत निवडणूक कालावधीत शहरातील कायदा व सुव्यवस्था कोणत्याही परिस्थित बिघडू देणार नाही अशी स्पष्टोक्ती यावेळी पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी केली आहे,


0 टिप्पण्या