चित्रा न्युज प्रतिनिधी
आदमापूर :- अमावस्या श्री क्षेत्र आदमापूर येथील संतश्रेष्ठ बाळु मामाच्या यात्रेला येणाऱ्या भाविकांचा मोठा प्रतिसाद एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागाला लाभला असून, या यात्रेच्या कालावधीत (१९ व २० डिसेंबर) कोल्हापूर विभागाने तब्बल २१ लाख रुपये इतके उत्पन्न मिळवले आहे.
१९ व २० डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या अमावस्या यात्रेदरम्यान कोल्हापूर विभागाने ३८ बसेसच्या माध्यमातून तब्बल ६३४ फेऱ्या द्वारे ३४ हजार ४३४ भाविक प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली आहे. या नियोजनबद्ध जादा फेऱ्यांमधुन एसटीच्या कोल्हापूर विभागाला केवळ २ दिवसात तब्बल २१ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.
-श्री. क्षेत्र आदमापुर येथे दर महिन्याच्या अमावस्येला संतश्रेष्ठ बाळुमामाची मोठी यात्रा भरते. या यात्रेला दक्षिण कर्नाटकातून आणि महाराष्ट्रातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. डिसेंबरमध्ये झालेल्या या यात्रेसाठी एसटीने अतिशय चांगले नियोजन केले होते. दर पंधरा मिनिटाला कोल्हापूर- आदमापूर व आदमापुर निपाणी या मार्गावर बसेस सोडण्यात आल्या. ठीक, ठिकाणी 'प्रवासी मित्र 'म्हणून एसटीचे कर्मचारी प्रवाशांना मदत करण्यासाठी दोन दिवस अहोरात्र उभे होते. अर्थातच या सर्व परिश्रमाचा फलनिष्पत्ती म्हणून मागील वर्षी याच कालावधीत झालेल्या यात्रेच्या तुलनेमध्ये यंदा एसटीच्या कोल्हापूर विभागाला तब्बल १० लाख रुपये जास्त उत्पन्न मिळाले आहे.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटीने नियोजनबद्ध पद्धतीने बससेवा उपलब्ध करून दिली. तसेच यात्रा कालावधीत हजारो प्रवाशांनी एसटी सेवेचा लाभ घेतला. यामुळे वाहतूक उत्पन्नात मोठी वाढ झाली असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे विभाग नियंत्रक अभय देशमुख यांनी केले आहे.
भाविकांची सुरक्षित, सुलभ व वेळेत वाहतूक व्हावी यासाठी चालक, वाहक तसेच विविध आगारातील कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. याचे देखील त्यांनी कौतुक केले आहे. एसटी महामंडळाच्या या कार्यक्षम नियोजनाबध्दल यात्रेतील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.


0 टिप्पण्या