चित्रा न्युज प्रतिनिधी
भोपाळ:-मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमधील मंत्री प्रतिमा यांचे धाकटे बंधू आणि मेहुण्याला गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर काँग्रेसने राज्य सरकारवर निशाणा साधला आणि म्हटले की मध्य प्रदेशात ड्रग्ज नेटवर्क नाही, परंतु आता भाजप नातेवाईकांचे नेटवर्क सक्रिय आहे. गांजा तस्करी प्रकरणात भावाच्या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर प्रतिमा बागरी यांनी माध्यमांवर संताप व्यक्त केला.
मध्य प्रदेशातील नगरविकास आणि गृहनिर्माण राज्यमंत्री प्रतिमा बागरी यांचे भाऊ अनिल बागरी आणि त्यांचे मेहुणे शैलेंद्र सिंह यांना गांजा तस्करीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. अनिल बागरी यांना रामपूर बघेलन पोलिसांनी 46 किलो 134 ग्रॅम गांजासह ताब्यात घेतले. त्यांचा सहकारी पंकज सिंह यालाही अटक करण्यात आली.
मठा येथील रहिवासी पंकज सिंह यांच्या घरात भाताच्या पोत्यांमध्ये गांजा लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घरावर छापा टाकून गांजा जप्त केला. पंकज यांच्या चौकशीत हा गांजा अनिल बागरी आणि शैलेंद्र सिंह यांचा असल्याचे उघड झाले. यावरून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. शैलेंद्र सिंह सध्या बांदा जिल्ह्यात एका गुन्ह्यात तुरुंगात आहेत.
सतना जिल्ह्यातील एससीसाठी राखीव रैगांव विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या प्रतिमा बागरी यांचा भाऊ आणि मेहुणे ड्रग्ज तस्करीत अडकल्यानंतर खजुराहो येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित होत्या. पत्रकारांनी त्यांना या प्रकरणाबद्दल विचारले असता त्यांनी संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या कि तुम्ही लोक बकवास बोलत आहात. मात्र नंतर त्यांनी आपला सूर बदलला आणि सांगितले की पोलिस त्यांचे काम करत आहेत. जो कोणी चुकीचा गुन्हा केला असेल, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. दोषींना सोडले जाणार नाही. कोणीही स्वतःहून नातेवाईक बनवू शकतो. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आधी तथ्ये पडताळून पहा आणि नंतर बोला. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षस्तरीय चौकशीदरम्यान त्यांनी स्पष्ट केले की अनिल त्यांचा भाऊ आहे, परंतु त्यांचा तिच्या मेहुण्याशी संबंध नाही.
शैलेंद्र सिंग याला यापूर्वी सतना येथील सिंगपूर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिसांनी कोरेक्स या अंमली पदार्थाच्या कफ सिरपची तस्करी केल्याबद्दल अटक केली होती आणि अंदाजे 5.5 कोटी रुपयांचा व्यवहार उघडकीस आला होता. शैलेंद्रला यापूर्वी गांजा आणि दारूची तस्करी केल्याबद्दलही अटक करण्यात आली आहे. प्रतिमा बागरीचा भाऊ अनिल हा शैलेंद्रसोबत गांजा तस्करी करतो.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसने मध्य प्रदेशमधील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. तस्करीच्या आरोपाखाली भावाला झालेल्या अटकेबाबत प्रश्न विचारल्याने मंत्रिमहोदयांना आलेला राग पाहा. भाजपाच्या सरकारमधील मंत्र्यांचे नातेवाईक कशा प्रकारची काळी कामे करत आहेत. हे या अटकेमधून दिसून आले आहे, असा टोला मध्य प्रदेश काँग्रेसने सोशल मीडियावरून लगावला आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी यांनी प्रतिमा बागरी यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची मागणी करताना संपूर्ण राज्य ड्रग्जमध्ये बुडाले आहे आणि हीच भाजपची घराणेशाही आहे, अशी टीका केली जितू पटवारी यांनी केली.


0 टिप्पण्या