Ticker

6/recent/ticker-posts

सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजनिधीस प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे -: जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते


चित्रा न्युज प्रतिनिधी 
धुळे- देशसेवेत सैनिकांच्या अतुलनीय योगदानामुळे प्रत्येक भारतीयांच्या मनात सैनिकांबद्दल सर्वोच्च स्थान आहे. सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजनिधी संकलनाच्या माध्यमातून ऋण फेडण्याची संधी आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने ध्वजनिधी संकलनात मोठ्या प्रमाणात सहयोग द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आज सकाळी आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन-2025 निधी संकलन शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, राज्य राखीव पोलिस दलाचे  समादेशक प्रभाकर शिंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. नीलेश पाटील (निवृत्त), निवृत्त कर्नल उत्तमराव पाटील, व्हीएसएमओ आयसीएचएसचे ग्रुप कॅप्टन अविनाश देवरे (निवृत्त), गट विकास अधिकारी प्रदीप पवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते म्हणाल्या की, संपूर्ण देशात 7 डिसेंबर हा ध्वज दिन म्हणून पाळण्यात येतो. या दिवसापासून ते पुढील वर्षांच्या 30 नोव्हेंबरअखेर पर्यंत ध्वज निधीचे संकलन केले जाते. देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले, अशा जवानांच्या कुटुंबीयांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करुन त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे तसेच युद्धात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जात असल्याने या निधीस प्रत्येक नागरिकाने मदत केली पाहिजे.

धुळे जिल्ह्यात मागील वर्षी सर्वांच्या सहकार्याने उद्दिष्टापेक्षा अधिक निधी संकलित झाला आहे. याबद्दल त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयासह निधीस सढळ हाताने मदत करणाऱ्या सर्व विभागांचे कौतुक केले. तसेच यापुढील काळातही सर्वांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने माजी सैनिकांचे प्रश्न, अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ध्वजदिन निधी संकलनामागील भूमिका विषद करुन त्यांनी सांगितले की, जिल्ह्याला गेल्या वर्षी 68 लाख रुपये निधी संकलनाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी जिल्ह्याने 69 लाख 80 हजार इतका निधी संकलीत केला. जिल्ह्यात मागील वर्षी सर्वाच्या सहकार्याने उद्दिष्टापेक्षा अधिक निधी संकलीत झाला आहे. याबद्दल जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, शैक्षणिक संस्था व जिल्हा परिषद, महानगरपालिका, नागरिक तसेच सर्व देणगीदारांचे आभार मानून मागील वर्षी दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे यावर्षीही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी कर्नल उत्तमराव पाटील यांनी  आपले मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी शहीद सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर पोलीस बॅण्ड पथकाने मानवंदना दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते धुळे जिल्ह्यातील शहीद सैनिक, शौर्यपदक व युद्ध व युद्धजन्य परिस्थितीत अपंगत्व प्राप्त झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांचा वीर पत्नी, वीर माता/पिता, माजी सैनिक त्याचबरोबर गतवर्षी (2024) इष्टांक पूर्ण करणाऱ्या  कार्यालय प्रमुखांचा सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे काम केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मनोज पाटील यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. पाटील यांनी मानले. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कर्मचारी यांच्यासह सैनिकांच्या वीर पत्नी, विरमाता, विरपिता, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या