Ticker

6/recent/ticker-posts

नाशिकमध्ये साधुग्रामसाठी 350 एकरपेक्षा अधिक जागा देण्यास शेतकर्यांचा विरोध


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नाशिक:-नाशिकमध्ये 2027 मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभमेळासाठी साधूंच्या निवासाकरीता शासनाने 1200 एकर क्षेत्रावर साधुग्राम उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात साधुग्राम उभारणीसाठी प्रस्तावित वृक्षतोडीला विरोध झाल्यानंतर आता साधुग्राम उभारणीसाठी 350 पेक्षा अधिक जागा देण्यास शेतकर्यांनी विरोध केला आहे. मंगळवारी शेतकरी कृती समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 
साधुग्रामसाठी तपोवन परिसरातील 350 एकर जागेवर महापालिका व सरकारवतीने आरक्षण टाकण्यात आले आहे. यामध्ये अधिक वाढ करत सुमारे 1200 एकर हून अधिक जागा आरक्षित करून कुंभमेळ्याचा विस्तार करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. या निर्णयाला शेतकरी कृती समितीने विरोध दर्शविला. तपोवनातील आरक्षित 350 एकराहून अधिक इंचही जमीन कुंभमेळ्यासाठी देणार नाही, असा निर्णय शेतकरी कृती समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.
यासंदर्भात जेजुरकर मळा येथे शेतकरी कृती समितीची बैठक पार पडली. बैठकीस कृती समितीचे समाधान जेजुरकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. शेतकरी कुठल्याही प्रकारचे भूसंपादन, भाडेतत्वावर किंवा आरक्षित होऊ देणार नाही. शासनाने आरक्षित आहेत त्याच जागेवर कुंभमेळा करावा. अन्यथा शेतकरी कृती समिती शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात तीव्र स्वरुपात आंदोलन छेडेल असा इशाराही कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. यामुळे साधुग्रामची वाटचाल अधिकच बिकट बनली आहे.
तपोवनापासून ते थेट नांदूर गावापर्यंत 1200 एकर जागेवर साधुग्रामच्या उभारणीसाठी जागा अधिग्रहीत करण्याकरीता नाशिक उपविभागीय कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मागील तीन वर्षातील जमिनीचा पिकपेरा, सातबारा उतारा शेतकऱ्यांकडून मागविण्यात आला आहे. सदरची जागा तात्पुरत्या स्वरुपात भाडे तत्वावर घेणार असल्याचे कारण सांगितले जात असले तरी स्थानिक शेतकरी मात्र कायमस्वरुपी आरक्षणामुळे धास्तावले आहेत. बिल्डर्सकडून देखील कायमस्वरुपी आरक्षण टाकले जाणार असल्याने, त्यामुळेचं जागांवर रेखांकन करण्यात आल्याचे सांगितले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या