चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती:-मेळघाटसह पश्चिम विदर्भातील नागरिकांची प्रशासकीय कामांसाठी होणारी मोठी परवड लक्षात घेता अचलपूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची कायमस्वरूपी निर्मिती करण्यात यावी, अशी ठोस मागणी प्रविण तायडे यांनी आमदार पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अचलपूर मतदारसंघाला लागून मेळघाटसारखा दुर्गम व विस्तीर्ण
भूभाग असून दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, धारणी, चिखलदरा आदी तालुक्यांतील नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जावे लागते. सुमारे १०० ते १३० किलो मीटरचे अंतर पार करून एका कामासाठी दोन ते तीन दिवस खर्ची पडत असल्याने नागरिकांचा वेळ व आर्थिक नुकसान होत आहे. अचलपूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाल्यास या सर्व तालुक्यांतील महसूल प्रकरणे, जमिनीचे वाद, आपत्ती मदत, पुनर्वसन आदी
कामांना गती मिळेल. अमरावती मुख्यालयावरील ताण कमी होऊन प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख
होईल, असे आ. तायडे यांनी निवेदनात नमूद केले आहे. मेळघाटातील भौगोलिक अडचणी व वाढती लोकसंख्या
लक्षात घेता शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.या मागणीमुळे अचलपूरसह संपूर्ण परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पालकमंत्री घेणार सकारात्मक निर्णय.


0 टिप्पण्या