शहापूरच्या चैताली आत्राम यांना महिला सन्मान पुरस्कार
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर:-समाजातील गरजू घटकांसाठी सातत्याने कार्य करत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या चैताली आत्राम यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महिला सन्मान पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे.
चैताली आत्राम या गरीब, अपंग, वृद्ध, महिला व मुलांसाठी मदतकार्य करत असून शासकीय योजना, पेन्शन, रेशन व्यवस्था, आरोग्य सेवा या सुविधा गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रिय भूमिका बजावत आहेत. महिला व बालकल्याण क्षेत्रात त्यांनी महिलांवरील अन्याय, घरगुती हिंसाचार प्रकरणांमध्ये मार्गदर्शन व मदत केली असून बालमजुरी व बालविवाह रोखण्यासाठी जनजागृतीचे प्रभावी उपक्रम राबवले आहेत.
शिक्षण व आरोग्य या मूलभूत विषयांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या मुलांना शाळेत दाखल करून देणे, शिक्षणासाठी आवश्यक मदत करणे, तसेच आरोग्य शिबिरे, लसीकरण व स्वच्छतेबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे कार्य त्या सातत्याने करत आहेत.
कुटुंबातील वाद, व्यसनमुक्ती, बेरोजगारी यांसारख्या समस्यांवर समुपदेशन व मार्गदर्शन करत गरज असल्यास संबंधित कार्यालयात अर्ज व तक्रारी दाखल करण्यास मदत करणे, हेही त्यांच्या कार्याचे महत्त्वाचे अंग आहे. मतदान, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण व कायदे याबाबत समाजजागृती करत सभा, रॅली व विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे.
ग्रामपंचायत, नगरपालिका, पोलीस , महसूल व समाजकल्याण विभागाशी समन्वय साधून समस्या सोडविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय ठरले आहेत. त्यांच्या या समर्पित सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रदान करण्यात आलेला महिला सन्मान पुरस्कार हा त्यांच्या कार्याला मिळालेली पावती असल्याचे मत सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.ठाणे शहापूरच्या सहज सुचलं मेरी आवाज सुनोच्या मुख्य संयोजिका
चैताली आत्राम यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून भविष्यातही त्यांच्या हातून असेच लोकोपयोगी कार्य घडत राहो, अश्या शुभेच्छा अनेकांनी त्यांना दिल्या आहेत.


0 टिप्पण्या