Ticker

6/recent/ticker-posts

' बाजीराव - मस्तानी ' ची प्रेम वनगाथा नागझिरा अभयारण्याच्या कुशीत विसावली


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली :-' बाजीराव-मस्तानी ' हे शब्द कानांवर दणकटपणे आदळले की, जवळपास आमच्या पिढीपर्यंतचे पेशवाईच्या इतिहासापर्यंत मजल दर मजल करीत पोहोचतील. आत्ताची पिढी या काळात फक्त ' बाजीराव मस्तानी ' ह्या चित्रपटापर्यंत पोहोचू शकते किंवा शेवटी शेवटी " पिंगा गं बाई पिंगा " या गाण्याभोवती फेर धरून नाचू शकते. थोरले बाजीराव पेशवे आणि बुंदेलखंडची राजकन्या मस्तानी यांची प्रेम कथा भारतीय इतिहासातील एक अजरामर पण शोकांतिका असलेली प्रेम कथा आहे. १८ व्या शतकात मराठा साम्राज्याचे पेशवे बाजीराव आणि मस्तानी यांच्यातील प्रेम, सामाजिक विरोध आणि त्यांच्या वियोगाची कहाणी आजही रंजक मानली जाते. राजकारण, विरह आणि उत्कट प्रेमाचा हा त्रिवेणी संगम राहिलेला आहे. परंतु या इतिहासाच्या व्यतिरिक्त राष्ट्रीय नागझिरा अभयारण्याला आणखी एक इतिहास आहे याची जाणीव नव्या पिढीला असेलच याची खात्री नाही. पेशव्याच्या ' बाजीराव मस्तानी ' सारखीच एक प्रेम वनगाथा नागझिरा अभयारण्याच्या कुशीत विसावलेली आहे हे सांगितले तर कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. जेवढी पेशवाईच्या काळातील 'बाजीराव मस्तानी' ची प्रेम कथा खरी होती तेवढीच राष्ट्रीय नागझिरा अभयारण्यातील ' बाजीराव मस्तानी ' ची प्रेम वनगाथाही खरी आहे. पेशवाईच्या काळातील इतिहासात बाजीराव मस्तानी ही नावे पुरुष आणि महिला वर्गाशी संबंधित होती तर  ही नावे वन अभयारण्यातील वाघ आणि वाघिनीशी निगडित आहेत. 
_______________________________________________
              
             नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प 

नागझिरा वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वसलेले एक अत्यंत महत्त्वाचे व निसर्गरम्य अभयारण्य आहे. १९७० मध्ये घोषित झालेले हे अभयारण्य जवळपास १५२ चौरस कि. मि. पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेले अभयारण्य त्याच्या घनदाट दक्षिण प्रदेशय उष्ण पानगळीच्या जंगलासाठी, बांबूच्या बेटासाठी आणि वन्यजीवांच्या समृद्धीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच हे ठिकाण उत्तम जंगल सफारीसाठीही ओळखले जाते. या अभयारण्याचे भौगोलिक स्थान २१.१४.३८ अंश उत्तर व ७९.५९.०९ अंश पूर्व असे आहे. नागझिरा हे नाव हत्तीवरून पडले. पूर्वी येथे हत्ती भरपूर होते आता फक्त हत्तीची अचल प्रतिकृती बघावयास मिळते. या अभयारण्यात सस्तन प्राण्यांच्या सुमारे ३४ जाती, पक्ष्यांच्या सुमारे २०० जाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ३६ जाती याव्यतिरिक्त अभयारण्यात ९ कुलातील ४९ जातीचे फुलपाखरे आहेत. हे जंगल अतिशय सुंदर असून १०० वर्षापेक्षाही अनेक मोठी झाडे असून १० फूट व्यास असलेली झाडे आजही डौलाने उभे आहेत हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे. १२ डिसेंबर २०१३ रोजी स्थापन झालेला हा महाराष्ट्रातील ५ वा आणि भारतातील ४६ वा व्याघ्र प्रकल्प आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प ( एन.एन.टी.आर.) व्याघ्र संवर्धन क्षेत्र आहे. कोका वन्यजीव अभयारण्य हा नवेगाव-नागझिरा अभयारण्याचा एक भाग आहे. वाघ आणि बिबट्यासाठी एक महत्त्वाचे नैसर्गिक अधिवास आहे. 
 
 
_______________________________________________
        
            ' बाजीराव मस्तानी ' ची प्रेम वनगाथा

मानवी आयुष्यातील प्रेम कल्पनापलीकडे असते कारण ते जाणवते. परंतु वन्य प्राण्यांच्या बाबतीत तसे नसते. आपण आपल्या कल्पना शक्तीच्या आकलन भरवशावर आपण ते जाणवू शकतो, बघू शकतो. कुत्रा, मांजर गाय, शेळी, पोपट या पाळीव प्राण्याविषयी निश्चित आपले प्रेम असते कारण ते पाळीव असतात. परंतु जंगलातील वन्य प्राण्यांचे वाघ, वाघीण, काळवीट, माकडे आणि इतर प्राणी त्यांचे प्रेम अबोल असते आपल्यासाठी. परंतु वन्य प्राण्यांच्या आयुष्यात पलीकडचे प्रेम असते. अशीच एक प्रेम कहानी आहे बाजीराव मस्तानी या वाघ वाघिणीची. बाजीराव मस्तानीचे प्रेमही असेच होते. ते फक्त जाणवत होते ते अभयारण्यातील प्राण्यांना, पक्षांना आणि वनसुरक्षा कर्मचाऱ्यांना. 
नागझिरा अभयारण्य झाल्यापासून या अभयारण्यात डेटू ( टी १ )  या नर वाघाने म्हणजे जय वाघाचा बाप ( बाजीराव ) यांने आपले साम्राज्य तयार करून गाजवले. कोका अभयारण्याला खरे दिवस दाखवले ते मस्तानी ( टी १० ) या वाघिणीने. आता पर्यंत या मस्तानी वाघिणीने दोन तीन बछडे दिले असल्याची माहिती समोर येते. परंतु अलीकडच्या काळात ना मस्तानी दिसत ना मस्तानीचे बछडे. या परिसरात मुबलक प्रमाणात पाणी आणि मांसाहारी प्राणी उपलब्ध आहेत पण वाघ आणि वाघीण कुठे आहे असा प्रश्न वन्यजीव प्रेमी आणि पर्यटक करीत आहे. पेशवे काळात  'बाजीराव मस्तानी' ची प्रेमगाथा विड्याच्या पानात रंगली, फुलली, बहरली. बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटातही * पिंगा गं पोरी पिंगा *  या गाण्यावर बेधुंद नाचली. परंतु या अभयारण्यातील बाजीराव मस्तानीवर ना चित्रपट होता ना गाणी होती. उरली होती तेवढी एक प्रेम वनगाथा. शेवटी ही प्रेम गाथाच राष्ट्रीय नागझिरा अभयारण्याच्या कुशीतच विसावल्या गेली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या