विनोद झोडगेंचा थेट सरकारला इशारा
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील हजारों शेतकऱ्यांच्या धानाची विक्री होऊनही केवळ 'उद्दिष्ट' संपल्याच्या तांत्रिक कारणामुळे चुकारे रखडले आहेत. हा अन्नदात्याचा छळ असून, येत्या आठवडाभरात धान खरेदीची मर्यादा वाढवून न दिल्यास भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकरी नेते विनोद झोडगे यांनी दिला आहे.
आज सोमवार दि., २३ मार्च २०२६ रोजी शेकडो शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयावर धडक देऊन उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.
खरेदी होऊनही 'बिलिंग' ठप्प तालुक्यातील मुडझा, आवळगाव, हळदा, वांद्रा, बरडकिन्ही आणि गांगलवाडी परिसरातील सेवा सहकारी संस्थांच्या केंद्रांवर शेतकऱ्यांनी धान विक्री केली आहे. मात्र, शासनाचे उद्दिष्ट संपल्यामुळे गेल्या ३-४ महिन्यांपासून या धानाची ऑनलाईन 'बिलिंग' झालेली नाही.
कर्जाचा डोंगर आणि बँकांचा तगादा
धानाचे चुकारे वेळेवर मिळतील या आशेवर शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले होते. मात्र, पैसे न मिळाल्याने कर्जाची परतफेड रखडली असून शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
प्रशासनाशी थेट चर्चा
विनोद झोडगे यांनी निवेदन सादर करतानाच जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली आणि तालुक्यातील विदारक स्थिती मांडून तातडीने मर्यादा वाढवण्याची मागणी केली.
शेतकरी नेत्यांचा आक्रमक पवित्रा
जर ७ दिवसांच्या आत शासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर भाकपच्या वतीने शेतकरी रस्त्यावर उतरून आपल्या हक्काचा लढा लढतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरदादा सातपुते, मंगेश ठाकरे, पत्रू साखरे, अमोल राऊत, नानाजी निकुरे, चोकेश्वर मैंद, गुंडांराज निकुरे, हेमराज प्रधान, तुळशीदास बगमारे, आनंदराव राऊत, मुरारी प्रधान, रवींद्र ननावरे, उत्तम गायकवाड, यशवंत महाजन, रवींद्र बुराडे, महादेव मेश्राम यांच्यासह या परिसरातील शेकडों शेतकरी उपस्थित होते.


0 टिप्पण्या