Ticker

6/recent/ticker-posts

प्राणी संरक्षणात निष्काळजीपणा झाला तर समस्त मनुष्यजीवन धोक्यात येईल - प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली :-जपान, फ्रेंच, चीन, अमेरिका आणि रशियासारख्या देशातील काही लेखकांनी वन्य पशुपक्षी, प्राणी, निसर्ग आणि पर्यावरणविषयक जाणिवांचे प्रगल्भ साहित्य लिहिले आहॆ. भारतातही डॉ. सलीम अली, मारुती चितमपल्ली, माधवराव पाटील डोंगरवार इत्यादी लेखक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल, वन आणि पशु -पक्षी आणि प्राणी संवर्धनात मौलिक कार्य केले आहॆ. निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल राखणे हे मनुष्याचे कर्तव्य आहॆ. आपण आपल्या  या सामाजिक बांधिलकीत कसूर केली तर ग्लोबल वार्मिंगसारख्या  महाभयंकर समस्या निर्माण होऊन संपूर्ण मनुष्यजातीचे जीवन निश्चितपणे धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन लाखनी येथील कवी, समीक्षक, नाटककार, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रख्यात वक्ते प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी केले. ते विनोद भोवते यांच्या 'प्राणिजीवन ' या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती साकोली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे, प्रमुख पाहुणे म्हणून साकोली वन्यजीव सहाय्यक वन संरक्षक विनीत लांडगे, डॉ. रेवाराम खोब्रागडे, साकोली पंचायत समितीचे गटशिक्षणधिकारी विजय आदमने, प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी पत्रकार अशोक गुप्ता, डी.जी. रंगारी, केंद्रप्रमुख अर्जुन मेश्राम, जमनापूर ग्रामपंचायत सरपंच पूजा देशमुख, उपसरपंच रवींद्र गडपायले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक करतांना विनोद भोवते यांनी या पुस्तकाचे येणाऱ्या पिढीसाठी किती महत्त्व आहे हे विषद केले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा आयोजकांतर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. स्वागत समारंभानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावरील समस्त मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले. विनोद भोवते यांच्या पुस्तकाची समीक्षा करतांना प्रा. डॉ. खोब्रागडे पुढे म्हणाले की, अनेक लेखक संदर्भ घेऊन पुस्तके लिहितात. मात्र विनोद भोवते यांनी प्रत्यक्ष ठिकठिकाणी जाऊन प्राण्यांचा अभ्यास केला. वन्यजीवन आणि वन्यप्राणी यांची माहिती वाचकांना मराठी साहित्यातून मिळाली. त्यात मारुती चितमपल्ली, माधवराव पाटील डोंगरवार आणि डॉ. सलीम अली यांचे मराठी साहित्यातले योगदान विसरून चालणार नाही. विनोद भोवते यांची वाटचाल याच पाऊल वाटेवर सुरू आहे. जे नवीन पिढीसाठी अभ्यासात्मक ठरावे. वन्य प्राण्यांची भाषा समजायला काळीज लागते आणि हे काळीज मराठी साहित्यात साहित्यिकांच्या माध्यमातून दिसून आले. प्राणी आणि निसर्गाकडून मनुष्याला खूप काही शिकण्यासारखे असल्याचे सांगून वन अधिकारी आणि शासनाकडून या बाबतीत ठोस प्रयत्न करण्याबाबत त्यांनी विनंती केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक विनोद भोवते, संचालन स्मिता पात्रीकर तर आभार प्रदर्शन पृथ्वीराज गडपायले यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या