Ticker

6/recent/ticker-posts

अकलूजच्या वैभवात भर: 'सदुभाऊ चौक' आता वारकरी संस्कृतीच्या दर्शनाने उजळणार!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
​अकलूज:- स्वच्छता, संस्कृती आणि आधुनिक विकास यांचा त्रिवेणी संगम साधत अकलूज शहराच्या सौंदर्यीकरणात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अकलूज नगरपरिषदेच्या माध्यमातून सदुभाऊ चौक येथे 'वारकरी पुतळ्याची' देखणी प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या उपक्रमामुळे परिसराचा कायापालट झाला असून, नागरिकांकडून याचे भरभरून कौतुक होत आहे.
​नगराध्यक्षा रेश्माताई अडगळे आणि गटनेते तथा उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकार झाला आहे. ही प्रतिकृती केवळ सुशोभीकरणाचा भाग नसून, त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या भक्ती मार्गाचा आणि वारकरी संप्रदायाचा गौरवशाली वारसा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पामुळे परिसरात स्वच्छता आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश दिला जात असून, येथील आकर्षक विद्युत रोषणाईने रात्रीच्या वेळी या चौकाचे सौंदर्य अधिकच विलोभनीय दिसत आहे.
​अकलूज शहराला आदर्श आणि सुंदर शहर बनवण्यासाठी नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष विशेष सक्रिय झाले आहेत. शहरातील विविध विकासकामांना गती देतानाच शहराचे बाह्यरूप पालटण्यावर त्यांचा भर आहे. या नियोजित विकासाचाच एक भाग म्हणून भविष्यात शहरातील प्रत्येक मुख्य चौकाचे सुशोभीकरण करून तेथे विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक देखावे उभारले जाणार असल्याचे, शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
​या अभिनव उपक्रमामुळे अकलूजकर रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असून, शहराच्या विकासाची ही नवी दिशा भविष्यात अकलूजला एक पर्यटन आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून नावलौकिक मिळवून देईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या