रस्त्यावरील गुजरीचा प्रश्न निकाली
नगराध्यक्षसह नगरसेवकांचेही नागरिकांकडून कौतुक
चित्रा न्युज प्रतिनिधी रवि भोंगाने
साकोली:-जनप्रतिनिधींचे सहकार्य आणि अधिकाऱ्यांचा अधिकार यांची सांगड घातली गेली तर अनेक प्रश्न निकाली निघू शकतात. याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा साकोलीमध्ये दिसून आले. साकोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर पुन्हा एकदा तालुक्यातील नागरिकांसाठी बाजीराव सिंघम ठरलेले आहेत. प्रसिद्धी माध्यमांनी हात घातलेल्या एका नाजूक विषयाला हाताळून पादचारी रस्त्यावरील वाढत्या गुजरीचा प्रश्न निकाली काढण्यात नगरपरिषद प्रशासनाला यश मिळालेले आहे. हा गांभीर्यपूर्ण प्रश्न मार्गी लागल्याने मुख्याधिकारी यांच्यासह नगराध्यक्ष, नगरसेवकांचेही नागरिकांनी कौतुक केलेले आहे. विशेष म्हणजे दैनिक भंडारा एक्सप्रेसने २७ फेब्रुवारी २०२६ च्या अंकात "पादचारी रस्त्यावरील वाढत्या गुजरीचा प्रश्न निकाली केव्हा निघणार ? " या आशयाचे बेधडक वृत्त प्रकाशित केलेले होते. या संदर्भात नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या या विषयावरील प्रतिक्रिया मागवून या विषयाचे गांभीर्य नगर परिषद प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेले होते हे विशेष. सविस्तर वृत्त असे, शासनाने रस्ते हे वाहन चालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि सुवेधीकरिता तयार केले होते. मात्र साकोली सेंदूरवाफा येथील मुख्य मार्गावर भाजीपाला विक्रेत्यांनी चक्क रस्त्यावरच बस्थान मांडल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे हा प्रश्नही ऐरणीवर आला होता. जुन्या आठवडी बाजारामध्ये प्रशस्त जागा उपलब्ध असतांनाही काही विक्रेत्यांच्या हट्टापाई हा रस्ता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत होता. गेल्या काही वर्षापासून सुरुवातीला मोजक्या भाजीपाला विक्रेत्यांनी रस्त्यावर दुकाने लावण्यात सुरुवात केली होती आणि पाहता पाहता पूर्ण रस्त्यावर भाजीपाला दुकानांची रांगच रांग तयार झाली. एका बाजूला व्यापारी दुकाने आणि दुसऱ्या बाजूला गुजरी यामुळे पायी चालणाऱ्यांना जागा उरलेली नव्हती. खरेदीसाठी येणारे ग्राहक आपले वाहने रस्त्यावर उभी करत होते ज्यामुळे वाहतुकीला खोळंबा होत होता. तर आपत्कालीन स्थितीत एकोडी मार्गाने येणाऱ्या अग्निशमन वाहन, पोलीस विभागाचे वाहन, रुग्णवाहिकांना उपजिल्हा रुग्णाण्यात येण्यासाठी अडचण निर्माण झालेली होती. भाजी विक्रेत्यांच्या दुकानांमुळे नागरिकांच्या वाहनांसह या तिन्ही शासकीय वाहनांना मोठा वळसा घालून जावे लागत होते. इतकेच नव्हे तर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालकांना सुद्धा भाजी विक्रेत्यांच्या गर्दीमुळे मुख्य हायवेवरून जावे लागत होते. ज्यामुळे त्यांचाही जीव धोक्यात आलेला होता.
______________________________________________
मोजक्या भाजीपाला विक्रेत्यांमुळे बहुसंख्य नागरिकांना त्रास होत असेल तर नक्कीच असे प्रश्न यापुढेही नगर परिषदेच्या वतीने मार्गी लागतील. जनसेवा ही ईश्वर सेवा हे आमचे ध्येय होते, आहे आणि पुढेही राहणार आहे. जनतेच्या सेवेकरिता जनतेने आम्हाला निवडून दिले त्यामुळे त्यांच्या प्रश्नाचा निपटारा करण्याचे कार्य नगरपरिषदेतर्फे निरंतर सुरू राहील.
प्रमोद गजभिये.
नगरसेवक, साकोली
_______________________________________________
नक्कीच हे कार्य नगरपरिषद प्रशासनाला शाबासकीची थाप देणारे आहे. रस्त्यावरील गुजरीमुळे लोकांना यातायात करणे कठीण जात होते. वयोवृद्ध लोकांकरीता रस्त्यावरील गुजरीचा कमालीचा त्रास वाढत चाललेला होता. एका बाजूला भाजीपाला विक्रेत्यांची दुकाने, दुसऱ्या बाजूला व्यापारी आणि इतर खाद्यपदार्थ व फळांची चार चाकी लाकडी वाहने त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. पायी चालणाऱ्यांनी नेमके चालावे कुठून हा प्रश्न निर्माण झालेला होता. अखेर हा प्रश्न एकदा का होईना सुटला. परंतु यानंतर पुन्हा गुजरी रस्त्यावर येणार नाही याची काळजी नगरपरिषद प्रशासनाला घ्यावी लागेल. चांगल्या कार्यासाठी मुख्याधिकारी यांच्यासह नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचेही अभिनंदन.
अशोक ताजराम रंगारी,
सेवानिवृत्त शिक्षक


0 टिप्पण्या