चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : मूल रोडवरील वन अकादमीजवळील ५०० एकर क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या टायगर सफारी प्रकल्पाला गती देण्याची मागणी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आ. किशोर जोरगेवार यांनी केली. यावर उत्तर देताना केंद्राकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच या प्रकल्पाला मान्यता मिळणार असल्याचे उत्तर वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांनी सभागृहाला दिले.
चंद्रपूर हा वाघांचे संरक्षण करणारा जिल्हा आहे. हे आमच्यासाठी भूषणावह असले तरी त्याचे दुष्परिणामही आम्हाला भोगावे लागत आहेत. दरवर्षी सुमारे २५० लोकांचे बळी वाघ घेत आहेत. त्यामुळे या नरभक्षी वाघांच्या रेस्क्यूसाठी रेस्क्यू सेंटर आणि टायगर सफारी चंद्रपूरला मंजूर करण्यात आली आहे. प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने त्याला मान्यताही दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला गती देण्याची मागणी आ.किशोर जोरगेवार यांनी यावेळी केली.
यासोबतच वाघ आणि बिबट्यांना पकडण्यासाठी वापरण्यात येणारे पिंजरे जुन्या पद्धतीचे असून ते रिमोट ऑपरेटेड करण्यात यावेत, अशीही मागणी केली. यावर उत्तर देताना वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांनी टायगर सफारीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला असल्याचे सांगितले व त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट केले. लवकरच या प्रकल्पाला मान्यता मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच हिंसक प्राणी पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिंजऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ते रिमोट ऑपरेटेड करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


0 टिप्पण्या