⭕ आरोपींना पोलिसांनी मदत केल्याचा आरोप!
⭕ पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारेनी आरोपींना अप्रत्यक्ष मदतीच्या हेतूने वर्तन केल्याचा संशय .
⭕ पोलिसच आरोपींना मदत करतील तर न्याय मागायचा कुठे??
गडचिरोली (चक्रधर मेश्राम) जिल्यातील राजकारण अग्रेसर असलेल्या आरमोरी येथील ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात तरुणाला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर आता पोलिसांच्या भूमिकेवर आणि कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात केवळ विलंबच नव्हे, तर आरोपींना अप्रत्यक्ष मदत केल्याचे आरोपही समोर आल्याची चर्चा सर्वत्र पसरल्याने खडबड उडाली आहे.
प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंगचा सापळा... रचून आर्थिक लूट आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असावा अशी परिसरात चर्चा सुरु आहे.
आरोपींनी २६ वर्षीय तरुणाला प्रेमसंबंधाच्या आडून जाळ्यात ओढण्यात आले. संबंधित तरुणी व तिच्या साथीदारांची “चॅटिंग व्हायरल करू” अशी धमकी देत त्याच्याकडून सुमारे ३ ते ४ लाख रुपये उकळले. इतकेच नव्हे तर सतत धमकी देत १५ लाखांची केली. मात्र नकारानंतर सदर प्रकरण जीवावर बेतले.
आरोपींनी आणखी १५ लाखांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर १४ मार्च रोजी तरुणाला अडवून बेदम मारहाण करत बळजबरीने कीटकनाशक पाजण्यात आले.
घटनेनंतर आरोपींनी पुरावे लपवण्यासाठी आत्महत्येचा बनाव रचत पीडिताच्या मोबाईलवरून त्याच्या वडिलांना “बाबा मला माफ करा” असा संदेश पाठवला आहे.
गंभीर अवस्थेत नागपूर येथे उपचार घेत असताना तरुण शुद्धीवर आल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस झाला.
वैद्यकीय अहवाल असूनही पोलिसानी १५ दिवस दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप
पीडित कुटुंबीयांच्या परिवारातील सदस्यांनी केला आहे .आरोपानुसार, नागपूर येथील इमामवाडा पोलिसांनी दिनांक १५ मार्च २०२६ रोजी वैद्यकीय तपासणी अहवाल आरमोरी पोलिसांकडे पाठवला होता. मात्र, त्यानंतरही जवळपास १५ दिवस आरमोरी पोलिसांनी या गंभीर प्रकरणाकडे ढुंकूनही पाहिले नाही, असा संतापजनक आरोप करण्यात आला आहे.
‘झिरो FIR’ नोंदवण्यात टाळाटाळ
नागपूरमध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न करूनही इमामवाडा पोलिसांनी ‘झिरो FIR’ नोंदवण्याऐवजी प्रकरण आरमोरीकडे ढकलल्याने कारवाईत मोठा विलंब झाला.
आरमोरी पोलिस अधिकाऱ्यावरही संशयाची छाया अजूनही कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यापेक्षाही गंभीर आरोप म्हणजे, गुन्हा दाखल होण्याआधीच फिर्यादीने दिलेला घटनाक्रम आरोपींपर्यंत पोहोचवण्यात आला. पीडित कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे यांनी आरोपींना अप्रत्यक्ष मदत व्हावी, अशा हेतूने वर्तन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
उशिरा गुन्हा दाखल करून आरोपीला फरार करण्यासाठी पोलिसांनी मदत केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
शेवटी ३ एप्रिल रोजी आरमोरी पोलिसांनी श्रेया हेमके, नितीन जोध आणि राजू अंबानी यांच्याविरुद्ध खंडणी व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. अपराध क्रमांक ९५/२०२६ कलम १०९, ३०४ (४) ११५(२) ३५१ (२) ३५१ (२) १२६(२) ३ (५) भा. न्या. न . प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे मात्र, तोपर्यंत आरोपी फरार झाल्याची माहिती आहे.
कुटुंबीयांचा संताप; चौकशीची मागणी...
“जर पोलिसच आरोपींना मदत करत असतील, तर सामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागायचा?” असा संतप्त सवाल पीडित कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.
तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
या प्रकरणात आता केवळ आरोपींचीच नव्हे, तर पोलिसांच्या भूमिकेचीही चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी सर्वत्र मागणी केली जात आहे आहे. आरोपींनी यापुर्वी अनेक प्रकारचे गुन्हेगारी कामे केल्याची सर्वत्र चर्चा सुरू असून पोलीस प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


0 टिप्पण्या