Ticker

6/recent/ticker-posts

पँथर आर्मीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण


चित्रा न्युज प्रतिनिधी 
​कोल्हापूर: कोल्हापूर : गवशी (ता. राधानगरी) येथील श्री. खंडोबा विकास सेवा संस्थेने  एका अल्पभूधारक अनुसूचित जातीतील शेतकऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करत, पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेने आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
​नेमके प्रकरण काय?
​राधानगरी तालुक्यातील गवशी येथील शेतकरी श्री. शहाजी संभाजी कांबळे यांच्या बँक खात्यावर १९ मे २०२२ रोजी कोणतीही मागणी नसताना १,०९,२५० रुपये जमा करण्यात आले आणि त्याच दिवशी कोणतीही स्वाक्षरी किंवा विड्रॉवल स्लिप नसताना १,२९,००० रुपये परस्पर काढून घेण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, तक्रारदाराच्या वडिलांच्या आणि मुलाच्या नावे डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याकडे गाळपास गेलेल्या ऊसाचे हक्काचे ४ लाख रुपये देखील संबंधित संस्थेने बेकायदेशीरपणे स्वतःच्या ताब्यात वर्ग करून घेतल्याचा आरोप पँथर आर्मीने केला आहे.
​प्रशासकीय उदासीनतेचा निषेध
​या आर्थिक अपहाराबाबत पोलीस अधीक्षक आणि सहकार निबंधक कार्यालयाकडे वारंवार दाद मागूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. प्रशासनाकडून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत संघटनेचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी ११ वाजेपासून हे आंदोलन तीव्र करण्यात आले.
​प्रमुख मागण्या:
​म्हासुर्ली बँकेचे तत्कालीन मॅनेजर संभाजी शंकर पाटील, संस्थेचे चेअरमन सर्जेराव ज्ञानू पाटील व संचालक मंडळावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा.
​शेतकऱ्याची हडप केलेली ४ लाख रुपयांची रक्कम व्याजासह परत मिळावी.
​संबंधित संस्थेच्या व्यवहारांची उच्चस्तरीय लेखापरीक्षण (Audit) चौकशी व्हावी.
​आंदोलनात यांचा होता सहभाग
​या उपोषणात पँथर आर्मीचे संस्थापक संतोष एस. आठवले, राष्ट्रीय संघटक अमोल कुरणे, समीर विजापुरे, जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर, जिल्हा महासचिव नितेश कुमार दिशांत, जिल्हा उपाध्यक्ष व पीडित शेतकरी शहाजी कांबळे, भैय्यासाहेब धनवडे, बंडू कांबळे (कोदवडे), तुकाराम कांबळे (कोंबरे), अजित कांबळे (कोलीक), महादेव कांबळे, तानाजी देवणे, सखुबाई (कंदलगांव), सुनिता कांबळे (साळवण), गीता कांबळे आदी कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी सहभाग घेतला आहे.
​"जोपर्यंत दोषींवर ठोस कारवाई होत नाही आणि पीडित शेतकऱ्याला त्याचे हक्काचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही. आंदोलकांच्या प्रकृतीस काही अपाय झाल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी प्रशासन व बँकेची असेल."
— मच्छिंद्र रुईकर (जिल्हाध्यक्ष, पँथर आर्मी)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या