Ticker

6/recent/ticker-posts

टिळक विद्यालय, खंडाळा येथे सरस्वती पूजन उत्साहात संपन्न

  चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा:-टिळक विद्यालय, खंडाळा ता. साकोली येथे शैक्षणिक सत्राच्या उत्तरार्धात ज्ञानदेवता माता सरस्वती यांच्या पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
          कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एन. निर्वाण सर होते. यावेळी व्यासपीठावर डी. डी. तुमसरे सर, पी. एन. कापगते सर, ए. आर. कुंभरे सर, सौ. एम. यू. मेश्राम मॅडम, टेंभुर्णीजी, सुनील मेंढे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.     
       उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती यांचे पूजन करून विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार व सद्गुण यांचे महत्त्व पटवून देण्यात आले.
कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक उपक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे, ज्ञानवर्धक बोधकथा, सुमधुर गीत तसेच आकर्षक नृत्य सादर केले. या सर्व सादरीकरणांमधून विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, सर्जनशीलता व कलागुण यांचे सुंदर दर्शन घडले.
        याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एन. निर्वाण सर तसेच इतर शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, शिस्त व संस्कार यांचे महत्त्व सांगितले. ज्ञानदेवतेच्या कृपेने विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्य घडवावे, असे मार्गदर्शन त्यांनी आपल्या मनोगतातून केले.
     या सुनियोजित कार्यक्रमाचे औचित्य साधून  सर्व विद्यार्थ्यांना गोड भोजन देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु. निधी उत्तमवार व कु. तेजश्री करंजेकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. त्यांच्या नेटक्या व सुबोध सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाला अधिक रंगत आली.
कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सरस्वती वंदन या भक्तिमय गीताने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन मोलाचे सहकार्य केले. तसेच विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी व संस्मरणीय ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या