महिला गंभीर जखमी : पंधरवड्यातील तिसरी घटना
वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी जनतेचा आक्रोश : वनविभाग सुस्त
रवि भोंगाने साकोली
साकोली :- नागझिरा वन्यजीव अभयारण्य परिसराला लागून असलेल्या पिटेझरी वन विभागाअंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये गेल्या दहा बारा दिवसांपासून वाघाने धुमाकूळ घातला असून दि.१ एप्रिल २०२६ रोजी आमगाव बुज या गावातील एक महिला शेतात मोहफुले वेचण्यासाठी आपल्या मुलासह गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने पुन्हा एकदा अचानक तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. तिची मान पकडून काही अंतर ओढत नेले मात्र तिचा मुलगा सोबत असल्याने त्याने मोठ्या हिंमतीने जवळच्या काठीने वाघाच्या तावडीतून आपल्या आईला सोडविले. प्रकृती चिंताजनक असल्याने महिलेला उपजिल्हा रूग्णालय साकोली येथे प्राथमिक उपचारानंतर भंडारा येथे हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे दि.१९ मार्च २०२६ पासून आजपर्यंत ही तिसरी घटना असून पहिल्या घटनेतील शेतकर्याचा जागीच मृत्यू झाला होता. दुसर्या घटनेतील महिला अजूनही मृत्यूशी झुंज देत आहे आणि वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेली आजची ही महिला थोडक्यात बचावली आहे. छाया सुधाकर मुंगमोडे वय ४३ असे या महिलेचे नाव असून तिच्या धाडशी मुलाचे नाव तन्मय आहे. तन्मयने प्रसंगावधान राखल्यामुळे त्याच्या आईचे थोडक्यात प्राण वाचले आहेत. तन्मयच्या प्रसंगावधानाबद्दल परिसरात कौतुक केले जात आहे. वाघाचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी परिसरातील जनता आक्रोश करत आहे. मात्र वनविभाग व प्रशासन सुस्त असल्यामुळे आणखी किती बळी घेतल्यानंतर वनविभागाला जाग येते ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सविस्तर वृत्तानुसार नागझिरा अभयारण्यालगतच्या आमगाव बुज येथील जंगल परिसराला लागून असलेल्या स्वत:च्या शेतशिवारात दि.१ एप्रिल रोजी स.९ वाजता सदर महिला छाया मुंगमोडे ही मोहफुले वेचण्यासाठी मुलगा तन्मय याचे सोबत बाईकने गेली व बाईकवरून उतरल्यानंतर अवघ्या काही क्षणातच काही कळण्याच्या आत दबा धरून बसलेल्या वाघाने महिलेल्या अंगावर झडप घेतली व मागेहून मान पकडली व काही फुटांपर्यंत ओढत नेले. भांबावलेल्या अवस्थेतील तन्मयने हे दृश्य डोळ्यादेखत पाहिले पण हिमंत न हारता तो काठी हातात घेवून वाघाच्या दिशेने धावला. त्यामुळे वाघाने महिलेला गंभीर जखमी अवस्थेत तिथेच सोडले व घटनास्थळावरून पोबारा केला. तन्मयने त्याही अवस्थेत आपल्या आईला बाईकवरून घरी आणले. तत्काळ याची सुचना वनविभागाला व पोलिसांना देण्यात आली. जखमी महिलेला तत्काळ उपचारासाठी साकोली येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर तिला भंडारा येथे पुढील उपचाराकरीता पाठवण्यात आले. विशेष म्हणजे सदर महिला ही एका अल्पभूधारक शेतकर्याची पत्नी असून तीन एकर शेतीच्या माध्यमातून आपली व कुटुंबाची उपजिवीका करत आहे. पती, एक मुलगा, एक मुलगी असा हा छोटासा परिवार आहे. सध्या रब्बी हंगामातील उन्हाळी धानाला सिंचनाकरीता रात्री बेरात्री शेतकर्यांना शेतात जावे लागते. उमरझरी, बाम्पेवाडा, घानोड, आमगाव या परिसरात शेतशिवारात भाजीपालावर्गीय पिकांची देखील लागवड केली आहे. मात्र वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्करे व अन्य वन्यप्राण्यांच्या धुमाकुळीने शेतकरी धास्तावले आहेत. मिरची तोडणी, मोहफुल वेचणी असे हंगाम असल्यामुळे विविध कामानिमित्ताने शेतकर्यांना शेतशिवारात व जंगलशिवारात जावेच लागते. मात्र या परिसरात सलग तिसरी मोठी घटना घडल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. त्याचा परिणाम शेताची कामे प्रभावित होण्याची शक्यता आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी आहे तर नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना वनविभागाने केल्या आहेत.
* पंधरवाड्यातील तिसरी मोठी घटना "
साकोली तालुक्यातील पिटेझरी वनविभाअंतर्गत येणार्या या भागात वाघाच्या शेतकर्यांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून दि.१९ मार्च रोजी बाम्पेवाडा येथील वसंत मेश्राम वय ५३ या शेतशिवारात मोहफुल वेचण्यास गेलेल्या शेतकर्याचा नरभक्षी वाघाने बळी घेतला. ही घटना ताजी असतांनाच दि.२८ मार्च रोजी उमरझरी येथील माया सोनवाने वय ५५ या मिरची तोडणीसाठी शेतात गेलेल्या महिलेवर वाघाने जीवघेणा हल्ला केला. या गंभीर जखमी महिलेवर अद्यापही अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतांनाच दि.१ एप्रिल रोजी आमगाव बुज येथे ही जीवघेणी घटना घडली आहे. वन्यप्राण्यांकडून एकापाठोपाठ एक जीवघेणे हल्ले होत असतांना वनविभाग मात्र सुस्त असल्याचे दिसून येत आहे. या नरभक्षी वाघाच्या हल्ल्यात आणखी किती जणांचा बळी जाणार असा सवाल आहे. मृतकाच्या परिवाराला व जखमी शेतकर्यांना ताबडतोब भरीव आर्थिक सहाय्य देवून या नरभक्षी वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करा अन्यथा फार मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा माजी जि.प.सदस्या माहेश्वरी नेवारे, डाॅ. नेपाल रंगारी, नंदकिशोर समरीत, आ.नाना पटोले यांचे स्वीय हरगोविंद भेंडारकर, पं.स.सभापती ललित हेमणे, नगराध्यक्ष देवश्री मनिष कापगते तसेच सर्व गावातील सरपंच व नागरिकांनी दिला आहे. लागोपाठ तीन घटनांमुळे नागरिकांची झोप उडून गेली आहे.


0 टिप्पण्या