चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : माध्यमीक शालांत परीक्षा सन 2026 च्या निकालात नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच गौरव करण्यात आला.

ओ.एफ.सी. हॉयस्कुल, चांदा येथील कु. श्रावणी प्रशांत लाखे यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत 93.20% गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. तसेच सेंटनेस हॉयस्कुल, सुमठाणा येथील ओजस देवेंद्र नागपुरे यांनीही 93.00% गुण प्राप्त करून समाजाचे नाव उज्ज्वल केले. त्यांच्या या यशाबद्दल नाभिक समाज दुकान असोसिएशनच्या वतीने विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

या प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग हणुमंते, महाराष्ट्र नाभिक युवा जिल्हाध्यक्ष सचिन नक्षिणे, माजी अध्यक्ष बंडू व्ही. लांडगे तसेच समाज कार्यकर्ते सतीश मांडवकर यांचे हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व नगाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या मेहनत, जिद्द, चिकाटी आणि पालकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याचे सांगण्यात आले. समाजातील इतर विद्यार्थ्यांनीही या गुणवंत विद्यार्थ्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.