Ticker

6/recent/ticker-posts

१ करोड रुपयांच्या उद्यानाची साकोली-सेंदुरवाफा नागरिकांना गरज आहे का ?

 साकोली नगरपरिषद क्षेत्रात गार्डन पे गार्डन 
 
साकोली-सेंदूरवाफा नागरिकांनी केला संताप व्यक्त

रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली: खुर्ची नसली की खुर्चीची वाट बघावी लागते आणि एकदा खुर्ची भेटली की तिच खुर्ची सत्ताधारी वाटत असते. मग आम्ही घेतलेला निर्णय हाच सर्वोत्तम वाटत असते. असा सत्ताधारी प्रकार आता साकोली-सेंदुरवाफा नगर परिषदेत दिसून आलेला आहे. गरज नसतांना सुद्धा १ एक करोड रुपयाचे उद्यान साकोली-सेंदूरवाफा नगरपरिषद क्षेत्रात जिथे घनकचरा प्रकल्प आहे तिथे उभारण्यात येत आहे. त्या ठिकाणी या आधीच सर्वोत्तम बगीचा तयार करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे नगरसेवक सपन कापगते यांचा विरोध वगळता बहुमताने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आधीच ज्या ठिकाणी सर्वोत्तम उद्यान आहे त्याच ठिकाणी १ करोड रुपयांच्या बगीच्याची गरज आहे का ? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला असून याविषयी साकोली- सेंदूरवाफा नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. १ करोड रुपयाच्या नवीन उद्यानाचा निर्णय रद्द करण्याची मागणी जोर धरत असून आधी साकोली- सेंदूरवाफा प्रभागातील जुनी कामे पूर्णत्वास न्यावे अशी मागणी समोर येत आहे. मागील वर्षी साकोली येथील तलावाची पाळ फुटलेली होती. ज्यामुळे मासेमारी बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. आता पावसाळा तोंडावर आहे. तलाव पाळ बांधण्याचे काम सुरू झालेले नाही. एकोडी फाटा ते तलाव वॉर्ड असा रस्ता काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. २०२१ पासून हा रस्ता जसाच्या तसा आहे. या रस्त्यावरील धुळीमुळे तलाव पाळीच्या रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना दम्याचा त्रास होऊ लागला आहे. तलाव पाळीवर शौचालय नाही. विशेष म्हणजे मालगुजारी तलावाचे सौंदर्यकरण अद्यापही बाकी आहे. चुलबंद नदीवरील साकोली स्मशानभूमीकडे दुर्लक्ष होत आहे. यासारखे अनेक प्रश्न कायम असतांना १ करोड रुपयांचा बगीचा तयार करण्याचा नेमके कारण काय ? असा संतापजनक सवाल साकोली-सेंदुरवाफा नागरिकांनी व्यक्त केलेला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या काळात घनकचरा व्यवस्थापन जागेवर करोडो रुपये खर्च करून भव्य बालोद्यान उभे केले. हे स्थळ पटमैदान जागेवर व निर्जनस्थळी आहे. आता यावर्षी २६ फेब्रुवारीला याच उद्यान जागेवर १ कोटी रुपयाचा बगीचा तयार करण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला. यावर प्रभाग क्रमांक १० मधील नगरसेवक इंजि. सपन कापगते या एकमेव नगरसेवकाने १८/०३/२०२६ ला आक्षेप घेतला. एकीकडे माजी नगरसेवक ॲड. मनिष कापगते यांच्या अथक प्रयत्नातून ड्रीम प्रोजेक्ट म्हणून तलाव बायपास रोड तयार करण्यात आला. सदर रस्ता निसर्गरम्य असून तेथे सौंदर्यात भर आवश्यक होते. परंतु चुकीच्या व निर्जनस्थळी असलेल्या जुन्या उद्यानावर पुन्हा १ करोडचा बगिचा निर्माण करणे याबाबतीत नागरिकांनी शंका व्यक्त केलेली आहे. सदर उपक्रम हा पैसा हडपण्यासाठीच तर नाही ना ? अशा अनेकांच्या प्रतिक्रिया आता प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊ लागलेल्या आहेत. 
______________________________________________


जुन्या जागेवर उद्यान तयार करण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला आहे. इतरत्र जागा शोधली असता बगिच्याला जागा उपलब्ध नव्हती. तरीसुद्धा जनतेच्याच मागणीनुसार हा ठराव रद्द करण्याचा अधिकार नगरपरिषद प्रशासनाला आहे. आमची प्रथम भूमिका ही पारदर्शकतेची आहे.
देवश्री कापगते. नगराध्यक्ष.
नगरपरिषद साकोली सेंदूरवाफा.
-----------------------------------------------

त्या निर्जनस्थळी जेथे घनकचरा व्यवस्थापन स्थळ आहे तेथे कुणीही जात नाही. अश्या ठिकाणी एका उद्यानावर दुसरा उद्यान तयार करणे हे बिनडोक काम आहे. साकोली-सेंदूरवाफा नगरपरिषद परिसरात विविध प्रलंबित कामे आहेत. ती कामे मार्गी लावण्याचा निर्णय बहुमताने घ्यावा. त्यावर नगरपरिषदेने पैसे खर्च करावेत. जेणेकरून नागरिकांचे समाधान होईल. एका उद्यानावर दुसरा उद्यान तयार करण्याचा निर्णय जर ठाम असेल तर माझा आंदोलनात्मक व आक्रमक पवित्रा असेल. नगरपरिषदेत इतरांची ढवळाढवळ खपवून घेतली जाणार नाही.
इंजि. सपन कापगते. नगरसेवक,
प्रभाग क्र. १० साकोली 
----------------------------------------------

साकोली करिता स्मशानभूमीचा प्रश्न कठीण आणि गंभीर आहे. याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. त्या ठिकाणी चांगलासा शेड उभारावे. बसण्यासाठी व्यवस्था करावी, खुर्च्या लावाव्यात. विजेची सोय करावी. या ठिकाणी एक चांगला बगीचा तयार होऊ शकतो. मृत माणसाला येथून जातांना वरती गेल्यावर एका सुंदर बगीच्यातून आल्याचे आणि गेल्याचे त्याला वरती समाधान वाटले पाहिजे. नगरपरिषने विनाकारण कुठल्याही कामावर पैसे खर्च करू नये आणि जनतेला सोयीचे होईल अशाच कामांचा निर्णय घ्यावा. 
अशोक ताजराम रंगारी. से. नि. शिक्षक.
साकोली.
-----------------------------------------------

शहरात दूसरी जागाच नाही काय आणि दुसरे कामेच नाहीत काय ? बगीच्यावर पैसे खर्च करण्याचा बहुमताने निर्णय घेण्यापेक्षा साकोली-सेंदूरवाफा प्रभागातील अनेक कामावर पैसे खर्च करण्याचा निर्णय घ्यावा. एका आयत्या उद्यानावर पुन्हा बगिचा निर्माण करणे हे सर्वसामान्य माणसाला न समजण्यासारखे आहे. बहुमताने घेतलेला निर्णय बहुमतानेच रद्द करण्यात यावा.
हेमंत भारद्वाज. माजी नगरसेवक 
साकोली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या