Ticker

6/recent/ticker-posts

देशाची रक्षा संस्कारांमुळेच होते : हभप विनायक कावळे महाराज


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-“अनेक रंगांनी, फुलांनी सजलेला गुलदस्ता म्हणजे आपला भारत देश आहे. प्रत्येक फुलाचा रंग वेगळा, सुगंध वेगळा; पण त्यांना बांधून ठेवणारा धागा एकच आहे आणि तो म्हणजे आपली संस्कृती. जर हा धागा तुटला, तर हा गुलदस्ता विखुरून जाईल. आज बाल संस्कार शिबिरात आपण जे बीज पेरत आहोत, ते उद्या या गुलदस्त्याचे रक्षण करतील. सर्वधर्म समभाव आणि विविधता ही भारताची खरी ताकद आहे. देशाची रक्षा केवळ सीमांवर होत नाही, तर ती संस्कारांमुळे होते,” असे प्रतिपादन राष्ट्रधर्म प्रचार समिती (गुरुकुंज मोझरी)चे तसेच सु-संस्कार शिबिराचे शिक्षक हभप श्री विनायकराव कावळे महाराज यांनी केले.
ते गुरुदेव सेवा मंडळ गणेशपूर, भंडारा यांच्या सौजन्याने जेसीस कॉन्व्हेंट विद्यालयाच्या प्रांगणात दि. १७ ते ३० मे २०२६ या कालावधीत आयोजित सर्वांगीण सु-संस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करत होते.

यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री राहुल निर्वाण, उपाध्यक्ष श्री श्यामभाऊ दलाल, सचिव श्री नामदेव आवारकर, सौ. प्रतिभा खंडाईत, सौ. नीता ठवकर आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच युवराज हरडे, पुरुषोत्तम गायधने, बाबुराव डोये, प्रभुदास पराते, सुखदेव साठवणे, हरीश बाबू ठोंबरे, सईदभाई शेख आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली. अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शिबिराचे आयोजक श्री नामदेव आवारकर यांनी अहवाल सादर केला.

श्री राहुल निर्वाण, सौ. प्रतिभा खंडाईत, सौ. नीता ठवकर आदींनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या सोनकुसरे यांनी केले, तर प्राची उखरे यांनी आभार प्रदर्शन केले.

या शिबिरात विविध गावांतून आलेल्या बालकांना दररोज सामूहिक ध्यान, सूर्यदर्शन, श्रमदान, सूर्यनमस्कार, योगासन, प्राणायाम, लाठी-काठी, लेझीम, कराटे, कथाकथन, राष्ट्रवंदना, भजन, संगीत इत्यादींचे प्रशिक्षण दिले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या