चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :- सध्याच्या काळात शिक्षक हा समाज आणि राष्ट्रनिर्मितीचे अत्यंत महत्त्वाचे कार्य प्रामाणिकपणे पार पाडत असताना त्यांच्या विविध समस्यांकडे शासनाने सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे मत शिक्षक भारती संघटनेचे तालुका कार्यवाह धनंजय तुमसरे सर यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले की, शिक्षक हा समाजाचा आधारस्तंभ असून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याबरोबरच जनगणना, निवडणुका, स्वच्छता अभियान, लसीकरण मोहीम, पर्यावरण संवर्धन यांसारख्या विविध राष्ट्रीय कार्यांमध्ये शिक्षक मोठ्या जबाबदारीने योगदान देत असतो. विशेषतः जनगणनेच्या कामामध्ये शिक्षक लखलखत्या ऊन्हाची पर्वा न करता घराघरांत जाऊन माहिती संकलित करीत आहे. नकाशा तयार करणे, प्रत्येक व्यक्तीची अचूक माहिती नोंदविणे आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणे हे काम शिक्षक अत्यंत संयमाने आणि प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.
धनंजय तुमसरे सर पुढे म्हणाले की, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काही गैरप्रवृत्तींकडून गालबोट लावले जात आहे. नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीसारख्या घटनांमुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या अशा प्रवृत्तीवर शासनाने कठोरात कठोर कारवाई करून शिक्षण क्षेत्राची पवित्रता कायम राखावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच अनेक शिक्षक 20 ते 25 वर्षे सेवा करून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहेत. दीर्घ अनुभव आणि उत्कृष्ट अध्यापन कार्य असूनही अशा अनुभवी शिक्षकांवर पुन्हा TET परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट लादणे ही गंभीर आणि जटिल समस्या असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाने अनुभवी शिक्षकांच्या सेवेला न्याय देत या प्रश्नाकडे सकारात्मक आणि मानवी दृष्टीकोनातून पाहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय शिक्षकांवरील वाढता प्रशासकीय ताण, विविध अतिरिक्त कामांचा भार याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शिक्षकांची अनेक वर्षापासून असलेली मागणी सकारात्मक दृष्टीने विचारात घेणे ही काळाची गरज आहे. आयुष्यभर राष्ट्र घडविण्यासाठी कार्य करणाऱ्या शिक्षकांना निवृत्तीनंतर सुरक्षित आणि सन्मानाने जीवन मिळणे हा त्यांच्या अधिकार आहे. शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. शिक्षकांचा सन्मान आणि आत्मविश्वास टिकून राहिला तरच भावी पिढी सक्षम आणि सुसंस्कृत बनेल,” असे मत धनंजय तुमसरे सर यांनी व्यक्त केले.


0 टिप्पण्या