Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षण विभागाचा भोंगळ नियोजन ! अकरावीच्या प्रवेशात खेळखंडोबा!


पहिल्याच दिवशी सर्व्हर ठप्प , वेबसाईट क्रॅशमुळे गोंधळ !

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :  दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदावर शिक्षण विभागाच्या भोंगळ नियोजनाने अक्षरशः पाणी फेरले. राज्यभर बुधवार, २१ मे पासून सुरू झालेल्या अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी वेबसाईट काही वेळातच बंद पडल्याने भंडारा जिल्ह्यात प्रचंड गोंधळ उडाला. सायबर कॅफे आणि महा-ई-सेवा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या, तर सर्व्हर क्रॅशमुळे अर्ज अर्धवट राहत असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

*वेबसाईटची गती संथ*
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश यंदाही केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आले आहेत. भंडारा जिल्ह्यात १४७ कनिष्ठ महाविद्यालय असून २०, ३०० प्रवेश जागा उपलब्ध आहेत्. २१ मे ते २८ मे या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करून १ ते १० महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरायचे आहेत. मात्र, आज २१ मे रोजी सकाळी आठ वाजता ही प्रवेश प्रक्रिया सुरू होताच वेबसाईट संथ गतीने चालू लागली आणि काही वेळातच पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना लॉगिन, अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे आणि महाविद्यालयांची निवड करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

*शिक्षण विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह*
विशेष म्हणजे, १९ मे सकाळी ११ वाजेपासून ते २० मे सायंकाळपर्यंत शिक्षण विभागाकडून सराव सत्र (प्रॅक्टिस सेशन) घेण्यात आले होते. त्यामुळे यंदा वेबसाईट सुरळीत चालेल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना आणि पालकांना होती. मात्र प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी सर्व्हर कोलमडल्याने शिक्षण विभागाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मागील वर्षीदेखील अशाच प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतरही प्रशासनाने कोणताही धडा घेतला नसल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे.

*विद्यार्थ्यांना आर्थिक फटका*
भंडारा जिल्ह्यात सकाळपासूनच विविध सायबर कॅफे, महा-ई-सेवा केंद्र आणि संगणक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र वेबसाईट बंद पडत असल्याने अनेक विद्यार्थी तासन्‌तास प्रतीक्षा करत बसले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेट आणि तांत्रिक सुविधांचा अभाव असल्याने अधिक फटका बसत आहे. विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रवेश नोंदणीची मुदत किमान दोन दिवसांनी वाढवावी, अशी मागणी नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक नदीम खान यांनी केली आहे.
दरम्यान, २६ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार असून २७ मे पासून प्रवेशाच्या फेऱ्या सुरू होणार आहेत. मात्र सध्याच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि पालकांमध्ये तिव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या