Ticker

6/recent/ticker-posts

माहे डिसेंबर २०२६ च्या माहूर नगर पंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले !

• जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार

• राजकीय पक्षाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात 

जयकुमार आडकिने चित्रा न्युज प्रतिनिधी 
माहूर-  माहे डिसेंबर २०२६ मध्ये होण्याची शक्यता असलेल्या माहूर नगर पंचायत च्या सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून विविध राजकीय पक्षातर्फे मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. डिसेंबर  २०२१ मध्ये झालेल्या नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत  एकत्र राष्ट्रवादी  कॉंग्रेस ७ कॉंग्रेस ६ एकत्र शिवसेना ३ व भाजप १ असे नगरसेवक निवडून आले होते.
           महाविकास आघाडीतील  राष्ट्रवादी कॉंग्रेस व  शिवसेना या दोन पक्षांनी युती करून नगर पंचायतवर सत्ता स्थापन केली होती. सद्यस्थितीत माहूर नगर पंचायत मध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना पक्षाच्या दोन पक्ष झाले असल्याने या दोन्ही पक्षाच्या क्षमता मर्यादित झाल्या असल्याचे बोलल्या जात असले तरी माहूर न.प. मध्ये मात्र दोन्ही पक्षाची अभेद्य आघाडी कायम असल्याचे दिसत आहे. परंतु हे  दोन्ही पक्ष कॉंग्रेस पक्षासोबत तेव्हापासून आजपर्यतही खूप अंतर राखूनच आहेत. शिवसेना उ.बा.ठा तर्फे  उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ नाना लाड हे सुद्धा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे त्यांच्या समर्थकातून बोलल्या जात आहे. 
            ना.मा.प्र  प्रवर्गासाठी  नगराध्यक्ष पद  आरक्षित असलल्या नगरपंचायत निवडणुकीत  याच बाबीचा फायदा उचलून नगर पंचायत ताब्यात घेण्यासाठी आ. भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनात भाजप शहराध्यक्ष व विद्यमान न.प. चे एकमेव नगरसेवक गोपू महामुने आतापासूनच मोर्चेबांधणीला लागले आहेत. असे असले तरी  देशभरात भाजप आघाडीवर असतांना सुद्धा आज पर्यत माहूर नगर पंचायत वर सता मिळविण्यास भाजपाला न आलेले यश व शहरात कॉंग्रेस विचारला माननाऱ्या मतदारांची बहुसंख्या पाहता सत्ता खेचण्यात यश मिळते का हे पाहणे महत्वाचे आहे. असे असले तरी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण भाजपवासी झाल्याने व जिल्ह्याचे निर्विवाद नेतृत्व त्यांच्याकडे असल्याने तसेच  नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल मधील एसआयआर चा ज्या प्रमाणे भाजपला फायदा झाला त्याप्रमाणे इथेही भाजपला  फायदा होऊ शकतो असे बोलल्या जात आहे.
          तर सतत १० वर्षापासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस श.प.  चे  नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी त्यांच्या कार्यकाळात माहूर शहरात केलेली अनेक विकास कामे याचा घोषा लावत पुन्हा एकदा सत्तेत कायम राहण्यासाठी मोर्चे बांधणी करीत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी  भाजप व विरोधी पक्षांनी अनेक विकासकामात भ्रष्टाचार व अनियमितता झाल्याची राळ उठवून सत्ताधाऱ्या विरुद्ध आवाज तीव्र केल्याने  तसेच यावेळी स्व.  माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पत्नी श्रीमती बेबीताई नाईक यांच्या नेतृत्वात होणाऱ्या निवडणुकीत  नगराध्यक्ष फिरोज दोसानी कोणती खेळी खेळून विजय संपादन करतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे. 
        तर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे हे म माहूर शहरातील सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या   पंतप्रधान आवास योजना घरकुल लाभार्थ्यांचे सन २०१८ पासून चे प्रलंबित असलेले अनुदानाचे हप्ते या सह दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन शहरातील सर्वसामान्य नागरिकांची सहानुभूती मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.  जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांच्या  नेतृत्वात कॉंग्रेस तर्फे जोरदार तयारी करून निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज झाले आहेत. शहरातील मुस्लीम मतदारांची लक्षणीय संख्या व शहरात कॉंग्रेस पक्षाच्या विचाराला मानणारा परंपरागत मोठा वर्ग यावरच त्यांची दारोमदार आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार व शिवसेना शिंदे गट यांचे पत्ते मात्र अद्याप खुले झालेले नाहीत. 
         तर एमआयएम कडून सुद्धा युवा  नेते इर्शाद मकरानी यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लांच करत तालुकाध्यक्ष सज्जाद शेख यांनी निवडणूक पूर्व तयारीला जोरदार सुरुवात केली असल्याचे दिसत आहे. अवघ्या सहा  महिन्यावर निवडणुक असल्याने  विविध सामाजिक उपक्रम राबवून लक्ष वेधून आगामी निवडणुकीच्या रिंगणात उभे टाकण्यास सज्ज असल्याचे संदेश देत असल्याचे दिसत आहे. अशोकराव चव्हाण यांचे खंदे समर्थक असलेले माजी नगराध्यक्ष प्राचार्य राजेंद्र केशवे न.प. निवडणूक लढविण्यास फारसे इच्छुक नसल्याचे त्यांच्या समर्थकातून बोलले जात असले तरी निवडणुकीच्या रणनीतीचा भाग म्हणून उच्चशिक्षित व अनुभवी चेहरा म्हणून ऐनवेळी भाजपा तर्फे त्यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार केले जाऊ शकते अशी माहूर शहरात जोरदार चर्चा आहे. तर माहूर शहरात काँग्रेस, एमआयएम व वंचित बहुजन आघाडीने एकत्र येऊन निवडणूक लढवावी अशी अपेक्षा  तिन्ही पक्षाच्या समर्थकातून व्यक्त होतांना दिसत आहे तूर्तास एवढे पुरे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या