चित्रा न्युज प्रतिनिधी
बीड:- जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. दोन प्रस्थापित समूहातील हस्तकांकडून वंचितचे कार्यकर्ते संदीप कोकणे, रोहित कोकणे आणि अजय बनसोडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पीडितांना गंभीर मारहाण झाल्याने त्यांना उपचारासाठी बीड येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेनंतर संबंधित पोलीस ठाण्याकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर बीड येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात एकूण सात आरोपींचा समावेश असून त्यापैकी केवळ तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित चार आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पोलीस उपाधीक्षक कटके यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर पोलीस प्रशासन सक्रिय झाले असून फरार आरोपींच्या शोधासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने उभी राहणार असून न्यायालयीन लढाही लढला जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यकचे प्रदेश प्रवक्ते प्रशांत बोराडे, पप्पू गायकवाड, प्रमोद निकाळजे, प्रदीप शिंदे, धम्मपाल धूळधुळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या