Ticker

6/recent/ticker-posts

जनगणना कर्मचाऱ्यास अडवून दमदाटी; माजी नगरसेवक सलीम टोपीविरुद्ध गुन्हा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमळनेर  : केंद्र शासनाच्या जनगणना प्रक्रियेत अडथळा निर्माण करत शासकीय कर्मचाऱ्यास दमदाटी केल्याप्रकरणी शहरातील गांधलीपुरा भागातील माजी नगरसेवक सलीम टोपी यांच्याविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात एनसीआर दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय कर्तव्य बजावत असलेल्या प्रगणकाला थेट हाकलून लावत जनगणना नोंद करू न दिल्याने प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रगणक दिनेश पालवे हे जनगणना कामकाजासाठी गांधलीपुरा भागात गेले होते. त्यावेळी त्यांनी संबंधित घराची माहिती विचारून जनगणना नोंद करण्याचा प्रयत्न केला असता, “तू यहां क्यों आया? यहां पे पच्चीस साल से कोई सरकारी अधिकारी आया नहीं, तू कैसे आया... चल निकल यहां से... यहां आना नहीं,” अशा शब्दांत दमदाटी करण्यात आली. तसेच संबंधित घराचा क्रमांक टाकू दिला नाही व शासकीय कामात थेट अडथळा निर्माण करण्यात आला.
या प्रकारामुळे प्रगणक दिनेश पालवे यांनी घडलेली घटना जनगणना नोंदवहीत नमूद केली. त्यानंतर त्यांनी तातडीने मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना माहिती दिली. प्रशासनाने या घटनेची तात्काळ दखल घेत अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २२१ व ३५२ प्रमाणे एनसीआर क्रमांक ०५२९/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून राष्ट्रीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

कोट


“भारताची जनगणना हे केंद्र शासनाचे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय काम असून त्यासाठी नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षक यांना नागरिकांनी आवश्यक ती माहिती देणे कायद्याने बंधनकारक आहे. अमळनेर नगर परिषदेमार्फत जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीचे काम सुरू असून नियुक्त प्रगणक श्री. दिनेश पालवे हे शनिवारी गांधलीपुरा भागात माहिती संकलनासाठी गेले असता त्यांना सहकार्य करण्यात आले नाही, तसेच त्यांच्याशी अयोग्य भाषेत बोलल्याची तक्रार प्राप्त झाली आहे.
शासकीय व राष्ट्रीय कामात अडथळा निर्माण करणे गंभीर बाब असून प्रशासनाने या घटनेची तात्काळ दखल घेत संबंधितांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाईसाठी पत्र दिले आहे.
नागरिकांनी जनगणना प्रक्रियेस पूर्ण सहकार्य करावे, तसेच प्रगणक व पर्यवेक्षक यांच्याशी सौजन्याने वागून आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी. जनगणना ही देशाच्या विकास आराखड्यासाठी महत्त्वाची प्रक्रिया आहे.”
— गणेश शिंदे
जनगणना अधिकारी तथा मुख्याधिकारी, अमळनेर नगर परिषद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या