Ticker

6/recent/ticker-posts

शेतांमध्ये वीजरोधक लाईटनिंग अरेस्टर यंत्रांची व्यवस्था करावी


(ग्रीन हेरिटेज सोशल फाउंडेशनने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन)


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-काही दिवसांत मान्सून सुरू होणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात वीज कोसळून जिल्ह्यात शेतात काम करणारे शेतकरी, मजूर तसेच इतर ठिकाणी अनेक नागरिक आणि जनावरे मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडतात. महाराष्ट्रात(भंडारा जिल्ह्यात सुद्धा)दरवर्षी सरासरी २८० शेतकरी व इतर नागरिकांचा मृत्यू होतो.

अशा परिस्थितीत विविध ठिकाणी शक्तिशाली लाईटनिंग इलेक्ट्रिक अरेस्टर (वीजरोधक यंत्र) बसविल्यास अनेक शेतकरी व इतरांचे जीव वाचवता येऊ शकतात. एक अरेस्टर साधारणतः १०० ते २०० मीटर परिसरातील आकाशीय वीज स्वतःकडे आकर्षित करून सुरक्षितपणे जमिनीत विलीन करतो, ज्यामुळे जीवितहानी टाळता येते. आकाशातून जमिनीवर कोसळणाऱ्या विजेचा दाब लाखो व्होल्ट इतका असतो. वीज सहसा उंच वस्तूंवर जसे की झाडे, इमारती, माणसे, खांब इत्यादींवर कोसळते आणि तिच्या संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तूंचे नुकसान होते.

आपण स्वतःचा बचाव करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, उंच खांबाजवळ, अनवाणी अवस्थेत मोकळ्या मैदानात, शेतात किंवा खळ्यात जाणे टाळावे. मोबाईलवर बोलणे तसेच घरातील टीव्ही व इतर विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. अशा आपत्कालीन परिस्थितीत पूर्ण खबरदारी घेतल्यास आपले अमूल्य जीवन सुरक्षित ठेवता येईल.

जिल्हा प्रशासनाकडूनही या संदर्भात वेळोवेळी सूचना व खबरदारीचे उपाय जाहीर केले जातात.

अलीकडील काळात एल-निनोमुळे राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस, गारपीट आणि वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अनेक नागरिक व जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. लवकरच मान्सून सक्रिय होणार आहे.

आकाशीय विजेपासून संरक्षणासाठी शेतांमध्ये व इतर ठिकाणी उंच पोल किंवा विशेष टॉवर उभारून अर्ली स्ट्रीमर एमिशन (ESE) तंत्रज्ञानावर आधारित शक्तिशाली लाईटनिंग अरेस्टर बसविणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत "सुरक्षा कवच योजना" किंवा "मुख्यमंत्री कृषी संरक्षण योजना" सुरू करून शेतकऱ्यांना ५० ते ७५ टक्के शासकीय अनुदान द्यावे. तसेच पीएम कुसुम योजनेअंतर्गत शेतांमध्ये बसविण्यात येणाऱ्या सोलर पंपासोबत वीजरोधक यंत्र अनिवार्य करावे, अशा विविध शेतकरीहिताच्या मागण्यांचे निवेदन ग्रीन हेरिटेज सोशल फाउंडेशनतर्फे जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या