Ticker

6/recent/ticker-posts

अकलूज पोलिसांची मोठी कामगिरी; लूट, चैन चोरी व सोनसाखळी हिसका प्रकरणातील आरोपी जेरबंद

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अकलूज :-अकलूज पोलिसांनी मारहाण करून रोख रक्कम लुटणाऱ्या आरोपींना अटक करत तब्बल 99 हजार 350 रुपये रोख रक्कम हस्तगत केली असून, त्याचबरोबर दोन स्वतंत्र चोरीच्या गुन्ह्यांचाही यशस्वी छडा लावला आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील वायफळ येथील एक व्यक्ती 3 जून 2026 रोजी अकलूज येथे जेवण करून एसटी स्थानकाकडे पायी जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांना दुचाकीवरून लिफ्ट देण्याचे आमिष दाखविले. मात्र, एसटी स्थानकाऐवजी त्यांना तांबोळी वसाहत-गिरमेवस्ती परिसरातील निर्जन ठिकाणी नेऊन काठीने मारहाण करण्यात आली आणि खिशातील 99,350 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने लुटण्यात आली.
या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सुनील भिंगारदिवे (रा. अकलूज), आजीनाथ गिरी आणि संतोष गायकवाड (दोघे रा. सराटी, ता. इंदापूर) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून संपूर्ण रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली.
बसस्थानकातील सोन्याची चैन चोरी उघड
दरम्यान, अकलूज नवीन बसस्थानकावर बसमध्ये चढताना एका प्रवाशाच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सुधीर कराळे आणि शुभम चव्हाण (दोघे रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांना अटक केली.
आरोपींकडून चोरीस गेलेली 94 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन शंभर टक्के हस्तगत करण्यात आली आहे.
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी हिसकावली
माळखांबी येथील एका महिलेच्या गळ्यातील 6 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मणी असलेला पत्ता हिसकावून नेल्याच्या प्रकरणाचाही पोलिसांनी छडा लावला. जनावरांसाठी चारा घेऊन जात असताना दोन इसमांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने हा प्रकार केला होता.
या प्रकरणी बालाजी पवार (रा. खेडभोसे) आणि पंडित होळकर (रा. व्होळे, ता. पंढरपूर) यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरीस गेलेले दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आणि पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, पोलीस हवालदार शिवकुमार मदभावी, विक्रम घाटगे, विनोद साठे, सुहास क्षीरसागर, राहुल रणनवरे, विशाल पोरे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. सायबर शाखेतील प्रविण मेटकरी व राहुल सोनकर यांनीही सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या