चित्रा न्युज प्रतिनिधी
औरंगाबाद : उत्तर प्रदेशातील लखनौ येथील विकास नगर परिसरातील अग्निग्रस्त व दुर्लक्षित वस्तीतील ५२ विद्यार्थी व विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. औरंगाबाद येथील सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष तथा विद्यार्थी नेत्यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
एप्रिल महिन्यात विकास नगर परिसरातील वस्तीत भीषण आग लागून शेकडो घरे जळून खाक झाली होती. या दुर्घटनेत अनेक कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. तसेच अनेक विद्यार्थ्यांचे दप्तर, पुस्तके, वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्य आगीत नष्ट झाले होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि त्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, कंपास बॉक्स तसेच इतर आवश्यक शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, नियमित अभ्यासाची सवय आणि प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची कास न सोडण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणाच्या बळावर स्वतःचे भविष्य घडवावे, असा संदेशही देण्यात आला.
अग्नितांडवानंतर अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले. अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नवी उमेद मिळत असून समाजात सकारात्मक संदेश जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.


0 टिप्पण्या