रवि भोंगाने चित्रा न्युज
साकोली;- सप्टेंबर महिना आला की शिक्षक वृंदांना वेध लागतात ते जाहीर होणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या ५ सप्टेंबर जयंती निमित्ताने शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवसाचे निमित्त साधून जिल्हा आणि राज्यस्तरावर आदर्श शिक्षक-शिक्षिका पुरस्काराची घोषणा होऊन राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केला जातो. परंतु या वर्षीपासून शिक्षण विभागाने कागदोपपत्री दुकानदारी प्रथा बंद करून पुरस्काराची फाईल टाकणाऱ्या शिक्षक- शिक्षकेची शाळा बघण्यात येणार आहे. शिक्षण संचालकांनी काही सुधारित निकष जारी केले असून प्रत्यक्ष शाळा पाहूनच आदर्श शिक्षक शिक्षिकांच्या पुरस्काराची घोषणा होणार आहे. त्यामुळे कागदोपत्री " टकाटक फाईल " तयार करून पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविणाऱ्या शिक्षक-शिक्षिकांना यानंतर चाप बसणार आहे. सविस्तर वृत्त असे की, शिक्षक दिन अवघ्या २ महिन्यांवर येऊन ठेपलेला आहे. राज्यशिक्षक पुरस्कारांची लगबगही सुरू झालेली आहे. मात्र यंदा कागदोपत्री प्रस्ताव पाहिला आणि पुरस्कार घोषित केला ही पद्धत हद्दपार करण्यात आलेली आहे. त्याऐवजी संबंधित शिक्षक-शिक्षिकांच्या शाळेची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच पुरस्कारासाठी त्यांची निवड होणार आहे. त्या दृष्टीने पुरस्काराच्या निकषातही सुधारणा करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील शिक्षक-शिक्षिकांना दरवर्षी राज्य शासनामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदाही ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी हा सन्मान सोहळा पार पडणार आहे. त्याकरिता शिक्षण संचालनालयाने २७ जून ते १० जुलै या कालावधीत शिक्षक-शिक्षकांकडून ऑनलाईन स्वरूपात प्रस्ताव मागितलेले आहेत. मात्र यंदा पुरस्काराच्या निकषात एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. शिक्षक-शिक्षकांनी प्रस्ताव पाठविल्यानंतर जिल्हास्तरीय समितीकडून त्याची छाननी करणे, त्यातील निवडक प्रस्तावाची राज्यस्तरावर छाननी करणे आणि त्यातून पुरस्कारासाठी शिक्षकांची नावे निश्चित करणे अशी पद्धती आतापर्यंत अवलंबण्यात येत होती. यंदाही अशीच पद्धत ठेवण्यात आली असली तरी त्यात एक मोठा आणि महत्त्वाचा नवा निकष घालून देण्यात आला आहे. प्रस्ताव पाठविल्यानंतर त्या प्रत्येक शिक्षक आणि शिक्षिकांच्या शाळेची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. जिल्हास्तरावरील समिती ही पाहणी करणार आहे. शिक्षक आणि शिक्षिकेने आपल्या प्रस्तावात नमूद केलेल्या सर्व गोष्टी प्रत्येक शाळेत प्रतिबिंबित होत आहे की नाही याची खातरजमा या पाहणीवेळी केली जाणार आहे. त्यात संबंधित शिक्षक-शिक्षिका पुरस्कारा योग्य पात्र वाटली तरच त्यांना जिल्हास्तरीय मुलाखतीसाठी बोलाविले जाणार आहे. तेथे पात्र ठरल्यानंतर त्यांचा प्रस्ताव राज्य स्तरावर जाईल आणि तेथेही मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर राज्य निवड समितीच्या बैठकीत पुरस्कारासाठी अंतिम नावे निश्चित केले जातील. त्यामुळे कागदोपत्री " टकाटक फाईल " तयार करून पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविणाऱ्या शिक्षक-शिक्षकांना यापुढे चाप बसणार आहे. परिणामी प्रत्यक्ष शाळेत ज्यांचे काम झळकेल त्यांनाच पुरस्कार मिळणार आहे.
______________________________________________
कला क्रीडा शिक्षकांचाही समावेश
दरवर्षी प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, आदिवासी क्षेत्रातील शिक्षक, दिव्यांग गटातील शिक्षक तसेच महिला शिक्षिका अशा गटातून पुरस्कार दिले जातात. यंदा त्यात आणखी एका गटाची भर पडलेली आहे. कला आणि क्रीडा या गटातही यंदा पुरस्कार वितरीत केले जाणार आहे. त्यावरून पुस्तकी अभ्यासक्रमासोबतच कला आणि क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी धडपडणाऱ्या शिक्षक आणि शिक्षिकांचा सन्मान होणार आहे.
______________________________________________
शिक्षक दिनाचा मुहूर्त पाडणार का ?
गेल्या काही वर्षांपासून शिक्षक दिनी पुरस्कार वितरण करण्याचा मुहूर्त हुकत आहे. पुरस्कार विजेता शिक्षकांची नावे घोषित होतात मात्र प्रत्यक्ष वितरण कधीतरी उशिराने केले जाते. यंदा मात्र शिक्षण संचालनालयाने प्रस्ताव मागविण्यापासून तर वितरण पर्यंतचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे. त्यात वितरणाची ५ सप्टेंबर ही तारीख स्पष्टपणे नमूद केलेली आहे. त्यामुळे पुरस्कार वितरण शिक्षक दिनाचा मुहूर्त यंदा हुकणार नाही अशी अपेक्षा करण्यात आलेली आहे.


0 टिप्पण्या