Ticker

6/recent/ticker-posts

भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू; आर्थिक मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर : माळशिरस तालुक्यात रविवारी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. म्हसवड–पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांना घेऊन जाणारे पिकअप वाहन अचानक रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याने १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 5 जणांना जीव वाचवण्यात यश आले. मृत सर्वजण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. हे भाविक म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरात दर्शन घेऊन गावाकडे परतत असताना हा अपघात घडला. तांदूळवाडी परिसरात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप थेट विहिरीत जाऊन पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनास्थळी असलेली विहीर पाण्याने पूर्ण भरलेली होती. तसेच विहिरीभोवती कोणतीही संरक्षण भिंत किंवा कठडा नसल्याने वाहन थेट पाण्यात कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले, तर प्रशासन आणि बचाव पथकेही घटनास्थळी दाखल झाली. या दुर्घटनेत महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याने गावावर शोककळा पसरली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिस आणि प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेबाबत वंचित बहुजन आघाडीने शोक व्यक्त करत, अपघाताची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही पक्षाकडून करण्यात आली आहे. पीडित कुटुंबांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या