Ticker

6/recent/ticker-posts

कृषी केंद्रांकडून पक्के बिल मिळत नसल्याचा आरोपशेतकरी ग्राहकांची लूट थांबविण्याची मागणी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अतनूर :-लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील अतनूर परिसरातील बहुतांश कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीटकनाशकांच्या खरेदीवर पक्के बिल दिले जात नसल्याने शेतकरी ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन समिती संस्था महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष राजकुमार कापडे, ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे लातूर जिल्हा संघटक व ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य बी.जी.शिंदे अतनूरकर, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश केंद्रे देवूळवाडीकर यांनी केली आहे.
यासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, उपविभागीय कृषी अधिकारी उदगीर तेजस यादव, तालुका कृषी अधिकारी संदीप वंळकुंडे, जळकोट तालुका कृषी अधिकारी संजय पाटील, अतनूरचे कृषी सहायक संदीप पाटील यांना निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कृषी केंद्रांकडून पक्की पावती न दिल्यामुळे निकृष्ट किंवा न उगवणाऱ्या बियाण्यांबाबत संबंधित कंपनीकडे तक्रार करता येत नाही. त्यामुळे शेतकरी ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. तसेच पावती नसल्याचा गैरफायदा घेत काही केंद्र चालक एमआरपीपेक्षा किंवा शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ग्राहक संरक्षण कायदा २०१९ व जीएसटी कायदा २०१७ नुसार ठराविक रकमेपेक्षा अधिक खरेदीवर पक्के बिल देणे बंधनकारक असतानाही अनेक कृषी केंद्रांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे. जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांची विशेष तपासणी मोहीम राबवून पावती न देणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाई करावी, आवश्यक असल्यास त्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच खरीप हंगामात बियाणे, खते व कीटकनाशकांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि शेतकऱ्यांना बोगस बियाणे व निकृष्ट कृषी साहित्य मिळणार नाही यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी या निवेदनाची तातडीने दखल घेऊन कृषी केंद्रधारकांना आवश्यक सूचना द्याव्यात तसेच वेळोवेळी तपासण्या करून शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार बियाणे, खते व औषधांचा पुरवठा होत असल्याची खात्री करावी, अशी मागणी अशासकीय सदस्य बी.जी.शिंदे अतनूरकर यांनी केली आहे. दरम्यान, या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड यांनाही देण्यात आली असून, लातूर जिल्ह्यात ग्राहक संरक्षण परिषद कक्षाची स्थापना करण्याची मागणीही ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन समिती संस्था महाराष्ट्र राज्य व ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या