Ticker

6/recent/ticker-posts

जयपूरमध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर हल्ला; आंदोलनस्थळी खळबळ


चित्रा न्युज प्रतिनिधी 

जयपूर :-राजस्थानची राजधानी जयपूर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर आंदोलनादरम्यान झालेल्या हल्ल्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. शहीद स्मारक परिसरात सुरू असलेल्या आंदोलनावेळी एका व्यक्तीने दीपके यांच्याजवळ येत काही सेकंदांतच त्यांना थपडा मारल्याची घटना घडली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’कडून जयपूरमध्ये शांततापूर्ण आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनासाठी मर्यादित संख्येने समर्थकांना परवानगी देण्यात आली होती. दीपके यांनी आंदोलन शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले होते.
मात्र आंदोलन सुरू असतानाच अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर आंदोलनस्थळी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली.
दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनानंतर देशभरात आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा इशारा कॉकरोच जनता पार्टीने दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर जयपूरमधील आंदोलनाकडे अनेकांचे लक्ष लागले होते. या घटनेमुळे आंदोलनाच्या सुरक्षेचा तसेच लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
राजकीय मतभेद असू शकतात, आंदोलनांबाबत विविध भूमिका असू शकतात; मात्र कोणत्याही विचारधारेविरोधात हिंसाचार हा लोकशाहीला शोभणारा मार्ग नसल्याचे मत विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी या घटनेचा निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

"मतभेद असतील तर ते संवादातून मांडावेत; हिंसा हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही," अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी जोर धरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या