चित्रा न्युज प्रतिनिधी
उदगीर, : उदगीर-अहमदपूर मार्गावरील सुकणी गावाजवळ आज दुपारी एसटी बस पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी उदगीरच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच २० बीएल-२०१८ क्रमांकाची एसटी बस दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास उदगीरहून अहमदपूरकडे जात होती. सुकणी गावाजवळ पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा रस्ता अरुंद असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
अपघात होताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सुकणी गावातील ग्रामस्थ तातडीने मदतीसाठी धावून आले. बस पलटी झाल्यामुळे अनेक प्रवासी आत अडकून पडले होते. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत चालकाच्या खिडकीतून बसमध्ये प्रवेश केला आणि एकामागून एक सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.या बसमध्ये एकुण ५९ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती वाहतुक निरीक्षक पृथ्वी कोकाटे यांनी दिली आहे.
अपघातात तीन प्रवाशांना दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने उदगीरच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळल्याचे बोलले जात आहे.घटनेची माहिती मिळताच संबंधित बस आगाराचे अधिकारी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे नेमके कारण कळु शकले नाही.


0 टिप्पण्या