चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल (सीबीएसई), जामनापूर/साकोली येथे भक्तिमय आणि सांस्कृतिक वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पूर्व प्राथमिक विभागातील नर्सरी व केजी-१च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रखुमाई तसेच वारकरी यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. टाळ, मृदुंग, भगव्या पताका, तुळशीच्या माळा आणि "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" अशा गजरात नवजीवनाच्या प्रांगणातून वारकऱ्यांची दिंडी उत्साहात काढण्यात आली. चिमुकल्यांच्या निरागस सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला. विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा, एकात्मता, भक्ती आणि संस्कार यांचा सुंदर संदेश उपस्थितांना दिला. या प्रसंगी शाळेचे व्यवस्थापक विनोद किरपान, प्राचार्या भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी सतिश गोटेफोडे तसेच पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, माधुरी हलमारे, रुपाली शेंडे, निशा देवगिरकर, शिला हरिणखेडे, योगिता मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले.आषाढी एकादशीचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच भारतीय संस्कृती व परंपरेची जपणूक करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. उपस्थित पालकांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आकर्षक वेशभूषेचे आणि भक्तिभावपूर्ण सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले.


0 टिप्पण्या