Ticker

6/recent/ticker-posts

'माझं गावच मंदिर शोभलं' च्या विचारातून भद्रावतीत आषाढी पालखी सोहळा उत्साहात

700-800 वारकऱ्यांच्या सहभागाने संपूर्ण नगरी विठ्ठल नामाने दुमदुमली

प्रतिनिधी : राजेश येसेकर

भद्रावती : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या _"माझं गावच मंदिर शोभलं"_ या विचारातून श्री गुरुदेव संस्कार केंद्र, भद्रावतीच्या वतीने देवशयनी आषाढी एकादशी निमित्त आयोजित श्रीगुरुदेव आषाढी पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. 

या उत्सवात सुमारे 700 ते 800 वारकऱ्यांच्या सहभागाने संपूर्ण भद्रावती नगरी 'विठ्ठल... विठ्ठल...' च्या नामघोषाने दुमदुमून गेली.

पंढरपूरच्या आषाढी वारीच्या परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवावा आणि विद्यार्थ्यांमध्ये धर्म, संस्कृती व सामाजिक ऐक्याचे संस्कार रुजावेत, या उद्देशाने दरवर्षी हा अभिनव उपक्रम राबविला जातो.

सोहळ्याची सुरुवात श्री गुरुदेव पादुकांच्या पूजनाने झाली. त्यानंतर पालखीने श्री कन्यका माता मंदिर, श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर, श्री संत गजानन महाराज मंदिर, भद्रनाग मंदिर व भवानी माता मंदिर येथे दर्शन घेत नगरपरिषद कार्यालय गाठले. येथे नगरपरिषदेच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी अभंग, पदन्यास आणि भारूडाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनपर सादरीकरण सादर केले. त्यानंतर श्रीसंत झिंगुजी महाराज मठात पादुकांचे पूजन करण्यात आले.

गुरुनगरमध्ये प्रवेश करताच नागरिकांनी जल्लोषात पालखीचे स्वागत केले. यापूर्वी नगरवासीयांनी स्वच्छता अभियान राबवून प्रत्येक घरासमोर रांगोळ्या, भगवे ध्वज आणि पताकांनी परिसर सजवला होता. त्यामुळे गुरुनगरला जणू पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिचोर्डीच्या पटांगणात पालखी सोहळ्याचा समारोप झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी अभंग गायन, पाऊली, भारूड व नृत्य सादर केले. रिंगण सोहळा हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. गुरुनगरमधील महिलांनीही रिंगण सादर करून शोभा वाढवली. भगवान पांडुरंग व श्री गुरुदेव यांच्या महाआरती आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

या सोहळ्यास नगराध्यक्ष, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

--------------------------------------------------------
भद्रावतीत आषाढी पालखी सोहळा उत्साहात
  
श्री गुरुदेव संस्कार केंद्रातर्फे आयोजित आषाढी पालखी सोहळ्यात 700-800 वारकरी सहभागी झाले. श्री गुरुदेव पादुकांची पालखी विविध मंदिरांतून गुरुनगरमध्ये आली. रिंगण, अभंग, भारूडाने वातावरण भक्तिमय झाले. 'माझं गावच मंदिर शोभलं' या विचारातून दरवर्षी हा सोहळा साजरा होतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या