Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे ३ वर्षातच ३०० कोटी रूपये पाण्यात

रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:- शासनाने कितीही चांगले प्रकल्प किंवा योजना नागरिकांसाठी आणल्यात आणि त्याची योग्यवेळी योग्यरीत्या अंमलबजावणी झाली तर निश्चितच त्याचा दीर्घकाळ फायदा नागरिकांना होतो. परंतु तीच योजना किंवा तोच प्रकल्प राबविताना संबंधित यंत्रणेच्या प्रमुखाचे किंवा त्या यंत्रणेत कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले तर काय होऊ शकते याचे प्रत्यंतर सध्या साकोली-सेंदुरवाफा नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या नागरिकांना दिसून येत आहे. बोदरा ते सेंदुरवाफा असा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर उड्डाणपूल उभारण्यात आला. मात्र ३०० कोटी रुपये खर्च केलेल्या या उड्डाणपुलाला केवळ ३ वर्षात तडे जाऊ लागले असून या उड्डाणपुलाच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उभे झालेले आहेत. भर पावसाळ्यात या उड्डाणपुलाचे भयावह चित्र सध्या साकोली-सेंदुरवाफा शहरातील नागरिकांना बघावयास मिळत आहे. शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ३०० कोटी रुपयांच्या निधीतून ६ पदरी उड्डाणपूल तयार करण्यात आलेला आहे. परंतु ३ वर्षानंतर या पुलाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. पावसाळ्यात उड्डाणपुलांच्या पिल्लरमधून पाण्याच्या धारा वाहत आहेत. सदर उड्डाणपूल तब्बल ३०० कोटी रुपयांच्या निधीतून तयार करण्यात आलेले होते. या महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलाचे लोकार्पण २९ मार्च २०२२ रोजी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मोठ्या थाटात झाले.  या ओहर ब्रिजच्या निर्मितीमुळे साकोली शहराच्या मुख्य मार्गावरील जड वाहनांच्या ताणतणावात मोठी घट झालेली होती. त्यामुळे स्थानिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येपासून दिलासा मिळालेला होता. परंतु केवळ ३ वर्षाच्या अल्प कालावधीतच या कोट्यावधीच्या पुलाची दैना झाली. मुसळधार पावसामुळे या पुलाच्या पिल्लरमधील भेगांमधून पाण्याचा विसर्ग अतिशय वेगाने होत आहे. पुलाच्या पिल्लर क्रमांक ४५, ४६ आणि ६६ मधील जॉइंट सुटलेले  आहेत. त्यामधून पावसाचे पाणी नळाच्या धारेप्रमाणे खाली जमिनीवर आदळत असलेले चित्र पाहायला मिळत आहे. पाण्याच्या सततच्या धारेमुळे केवळ पिल्लरच नव्हे तर पुलाच्या अगदी वरच्या पृष्ठभागावरील ( सरफेस)  डांबरी थर अनेक ठिकाणी उखडल्याचे दिसून येत आहे. अवघ्या ३ वर्षाच्या आतच हा राष्ट्रीय स्तरावरील पूल मेंटेन्स आणि दुरुस्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. परिणामी या प्रकल्पाचे काम करणाऱ्या संबंधित कंपनीच्या निकृष्ट कार्य प्रणालीवर आणि यंत्रणेच्या देखरेखिवर शंका उपस्थित झालेली आहे. या खस्ताहाल आणि धोक्याच्या परिस्थितीमुळे शहरातील नागरिक व वाहनचालक स्वतःच्या सुरक्षेबाबत कमालीचे धास्तवलेले आहेत. 
---------------------------------------------

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धोरणानुसार संबंधित कंत्राटदार कंपनीला दरवर्षी पावसाळ्यापूर्वीच उड्डाणपुलाची पाहणी करून तातडीने मेंटेनन्स व दुरुस्ती करणे कायद्याने अनिवार्य असते. मागील ३ वर्षापासून सातत्याने पावसाळ्यात या पुलावरून पाण्याची गळती होत आहे. नगर परिषदेमार्फत आता थेट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला अधिकृत पत्र पाठवून या पुलाची तातडीने व दीर्घकालीन दुरुस्ती करून घेण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत.
 
देवश्री मनीष कापगते.
नगराध्यक्ष, साकोली. 
_______________________________________________

३०० कोटीच्या निधीतून उभा राहिलेला हा उड्डाणपूल ३ वर्षांपूर्वी  विकासाचे प्रतीक मानला गेला होता. परंतु अवघ्या ३ वर्षातच या उड्डाणपूलाचा दरिद्रीपणा दिसून आला. उड्डाण पुलाच्या पिलरमधून नळासारखे पाणी वाहू लागणे म्हणजे या यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा नालायकपणा उघडकीस आला. हे काम करणाऱ्या कंत्राट कंपनीने आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला हात लावून शासकीय तिजोरीवर एकप्रकारे डल्ला मारला. यातूनच हे निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे हे स्पष्ट प्रमाण आहे. आज पुलाचे जॉईंट सुटत आहेत आणि डांबरी थर उखडत आहेत. भविष्यात एखाद्या वेळी मोठी दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी स्वीकारण्याचे धाडस कोण दाखविणार आहे ?

कैलास गेडाम. जिल्हा महासचिव, 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम.
_______________________________________________

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या