Ticker

6/recent/ticker-posts

अण्णाभाऊ साठे जागतिक कीर्तीचेविश्वविख्यात साहित्य सम्राट


लोकशाही - साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी असलेल्या १०६ व्या जयंतीनिमित्त साहित्यिक व अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख व त्यांच्या 'अभंग तरंग' या काव्यसंग्रहातील अभंग येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

अण्णाभाऊ साठे जागतिक कीर्तीचे
विश्वविख्यात साहित्य सम्राट

            विश्वविख्यात साहित्यिक, थोर समाजसुधारक, स्वातंत्र्य, समता व बंधुतेचे चित्र स्वसाहित्यातून चित्रित करणारे आणि विषमतेवर प्रहार करणारे वास्तववादी साहित्यिक लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या थोर आणि अनमोल कर्मकर्तृत्वाबद्दल दि.१ ऑगस्ट २०२६ ला असलेल्या १०६ व्या जयंतीनिमित्त  विनम्र अभिवादन ॥
      लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एका गरीब कुटुंबात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या कुळात १९२० च्या ऑगस्ट मासाच्या एक तारखेला झाला. सांगली जिल्हातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या ग्रामात जन्मलेल्या अण्णाभाऊंचे वडील भाऊ शिंदोजी साठे व आई बाळुबाई यांना गरिबीमुळे भोगाव्या लागणाऱ्या उपसमारीचा सामना अण्णाभाऊंना करावा लागला. ब्रिटीशांच्या शासनाविरूद्ध बंड पुकारणाऱ्या मातंग समाजातील 'फकिरा' या युवकामुळे मातंगाच्या प्रत्येक घराची चौकशी होत होती. त्यामुळे मातंग समाजातील लोकांना जीवन जगण्याबाबतीत कोणतीच सुरक्षितता राहिली नव्हती. म्हणून जवळ पैसा नसताना उपासमारीचा सामना करीत सांगलीपासून मुंबईपर्यंतचे ३७० किलोमीटरचे अंतर पायी चालून सहा महिन्यानंतर भायखळा येथे पोहोचले.
          मुंबईत पोहचल्यावर अण्णाभाऊ मिळेल ते काम करू लागले उदा.पेट्या वाहणे, कोळसा वाहणे, हॉटेल बॉय, बागकाम, विविध पोस्टर्स चिटकविणे इ. दीड दिवसाची शाळा शिकणाऱ्या अण्णाभाऊंना बाराखळीचे प्राथमिक ज्ञान झाले होते. मुंबईला आल्यावर विविध पोस्टर्स चिटकवण्याच्या व्यवसायातून पोस्टर्स वाचता वाचता ते अस्खलित वाचायला लागले. अशा प्रकारच्या कामांमुळे त्यांचा विविध लोकांशी संपर्क वाढू लागला. मुंबईतील गिरणी कामागारांचे संप- मोर्चे, विविध संघटना त्यात मनापासून कार्य करणारे कार्यकर्ते बघत त्यांच्या मनात अनेक विचार निर्माण होत होते. त्यातच त्यांना एक महत्त्वपूर्ण छंद जडला. तो म्हणजे वाचनाचा.  समाजासाठी झटणाऱ्या लोकांचे भरपूर साहित्य ते वाचू लागले. वाचता वाचता ग्रंथसंग्रह झाला, कारण विविध प्रकारचे ग्रंथ मिळून ते वाचून संग्रही ठेवण्याचा छंद व या छंदातून विविध परिवर्तनशील साहित्यिकांच्या जवळ जाण्याची संधी त्यांना मिळाली व त्यामुळे त्यांची चिंतनशील वृत्ती वृद्धिंगत होत गेली. त्यांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त झाल्यावर त्यांनी लेखनाला प्रारंभ केला. त्यांनी जे जीवन स्वतः पाहिले आणि उपभोगले तेच जीवन स्वतःच्या लेखनीतून साकार करण्याचा प्रयत्न केला,
               अण्णाभाऊंच्या साहित्यामुळे बहुजन समाज जागृत होऊ लागला. कारण त्यांनी पोवाडा, लोकनाट्य, कथा, कादंबरी, नाटकातून बहुजन समाजातील समस्या, त्यांचे दुःख व वेदना याला वाचा फोडण्यासाठी कार्य केले.विविध कार्यक्रमातून साहित्य संमेलनाच्या विचार मंचावरून दिलेल्या भाषणातून आणि त्यांच्या लेखणीतून साकार झालेल्या साहित्यातून त्यांच्या विचारसरणीचे दर्शन घडते. दि.२ मार्च १९५८ ला झालेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचा उद्‌घाटन करण्याचा मान अण्णाभाऊंना मिळाला होता. त्यावेळी ते दलित श्रमिकांविषयी स्वतःचे विचार व्यक्त करताना म्हणाले की, " ही पृथ्वी शेषांच्या मस्तकावर तरलेली नसून दलित श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे." अण्णाभाऊंनी या बहुजन श्रमिकांना पृथ्वीचा निर्माता म्हटलेले आहे,कारण उंच इमारती ,विज, धरणे, रेल्वे, अन्न तयार करणारा बहुजन श्रमिकच आहे.
             अण्णाभाऊ साठे विश्वविख्यात साहित्य सम्राट आहेत असे का म्हटल्या जाते,कारण त्यांनी पस्तीस कादंबऱ्या, तेरा कथासंग्रह, एक रशियाचे प्रवास वर्णन, चौदा लोकनाट्य व तमासे, तीन नाटक, दहा पोवाडे, एक शाहिरी इ. विपूल साहित्य निर्मिती केली आणि या त्यांच्या साहित्य विश्वाचे जगातील सत्तावीस देशात विविध भाषेत भाषांतर झाले. त्यामुळे अण्णाभाऊचं साहित्य हे भारतीय साहित्य राहिले नसून विश्वविख्यात झालं व अण्णाभाऊ साठे विश्वसाहित्यिक झाले व खरे विश्वभूषण ठरले. त्यांचे साहित्य फ्रान्स (फ्रेंच भाषा),पोलंड (पोलिश भाषा),रशिया (रशियन भाषा) ,जर्मनी (जर्मन भाषा), चेकोस्लोव्हाकिया (झेक भाषा), इंग्लंड/अमेरिका (इंग्रजी भाषा) आणि स्लोव्हाकिया (स्लोव्हाक भाषा) इत्यादी २७ देशातील १७ भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनुवादित झाले  व अभ्यासले गेले आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या वैयजंता, फकिरा, आवडी, वारणेचा वाघ, अलगूज, माकडीचा माळ, चिखलातील कमळ या सात कादंबऱ्यांवर अधारित अनुक्रमे वैजंयता, फकिरा, टिळा लावेत मी रक्ताचा, वारणेचा वाघ, अशी ही साताऱ्यांची तऱ्हा, डोंगरची मैना, मुरली मल्हारी रायाची या सात चित्रपटांची निर्मिती झालेली आहे.
     अण्णाभाऊंच्या या दर्जेदार कथा, कादंबरी व नाटकांचा समावेश सागर विद्यापीठ (एम.पी.), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर , शिवाजी विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (महाराष्ट्र) इ. विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात केलेला आहे. 
       साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रसिद्ध 'फकिरा' या कादंबरीला इ.स. १९६१ मध्ये महाराष्ट्र शासनाचा 'सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार' मिळाला आहे.वाचकांमधील प्रचंड लोकप्रियतेमुळेच आजपर्यंत विविध प्रकाशनांद्वारे फकीरा कादंबरीच्या ४६ हून अधिक आवृत्त्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत.
          प्रसिद्ध कवी ' नारायण सुर्वे ' म्हणतात की," 'फकिरा' ही कादंबरी म्हणजे मराठी भाषेतील अपूर्व लेणे आहे."
              साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विपुल आणि वैविध्यपूर्ण साहित्यावर महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये अनेक प्राध्यापक आणि संशोधकांनी पीएच.डी. (Ph.D.) साठी संशोधन केले आहे. 
शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर येथील प्रा.डॉ.बाबुराव गुरव १९८४ मध्ये " अण्णाभाऊ साठे : समाजविचार आणि साहित्य विवेचन "या विषयावर Ph.D. केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (BAMU), औरंगाबाद येथील प्राचार्य डॉ.माधव गादेकर यांनी १९९७ मध्ये  " अण्णाभाऊ साठे : साहित्य मूल्यमापन " या विषयावर Ph.D. केलेली आहे.डॉ.आशा धावडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून १९८९ ला
 " अण्णाभाऊ साठे: व्यक्ती आणि वाङ्मय " या विषयावर पीएच.डी. केलेली आहे.
इतरही अनेक विद्यापीठामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर अनेक प्राध्यापकांनी व संशोधकांनी Ph. D.केलेली आहे.
        अण्णाभाऊंच्या कथा, कादंबऱ्या, पोवाडे आणि लोकनाट्यांवर सखोल संशोधन करण्यासाठी महाराष्ट्रातील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये विशेष अभ्यास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत . उदा.
मुंबई विद्यापीठ, मुंबई येथे,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद इत्यादी विद्यापीठात अण्णाभाऊ साठे अभ्यास केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत .
     मातंग समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण खात्यामार्फत
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ स्थापन केले आहे. अण्णाभाऊंच्या विचाराचा वारसा जतन करणा-या कार्यकर्त्याला राहण्याची सोय व्हावी यासाठी न्या.भीमराव भोगे यांनी नांदेड येथे 'अण्णाभाऊ धर्मशाळा' स्थापन केली. प्रा. शिवाजी जवळगेकर यांनी लातूर येथे 'अण्णाभाऊ साठे साहित्य अकादमी स्थापन केली. समाजप्रबोधनाचे कार्य करण्यासाठी श्री. प्रल्हाद सोनवणे यांनी इ.स.१९७० च्या ऑगस्टमध्ये 'अण्णाभाऊ साठे फाऊंडेशन' ची स्थापना केली. ज्याची मुख्य शाखा पुणेला आहे. सुशिक्षित बेरोजगारांना मार्गदर्शनाची व नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी न्या. भीमराव भोगे यांनी ऑगस्ट १९९६ मध्ये 'अण्णाभाऊ साठे माहिती केंद्रा' ची स्थापना केली. या केंद्राचे मुख्य कार्यालय नाशिकला आहे. इ.स. १९९५ च्या ऑगस्टपासून प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी सातारा येथे स्थापन केलेल्या 'दलित स्वयंसेवक संघा'तर्फे 'अण्णाभाऊ साठे सामाजिक पुरस्कार दिला जातो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावावर चालणाऱ्या या सर्व उपक्रमांचा समाजातील बांधवांनी लाभ घेऊन इतर समाज बांधवांना या सर्व उपक्रमांची माहिती देणे आवश्यक आहे. इ.स.१९६९ च्या जुलै १८ तारखेला अनंतात विलीन झालेल्या लोकशाहीर - साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना दि.१ ऑगस्ट २०२६ रोजी असलेल्या १०६ व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम ॥

         अभंग
अण्णाभाऊ साठे

स्मरतात आज । 
थोर साहित्यिक ।।
कीर्ती जागतिक । 
अण्णाभाऊ ।।१।।

अण्णाभाऊ साठे ।
साहित्य अक्षर ।। 
समता विचार । 
लेखनीचा ।।२।।

प्रेरणेचे स्थान । 
कष्टकरी प्रजा ।। 
कामगार राजा । 
दूरद्रष्टा ।।३।।

लावियले नाही । 
पाख कल्पितांचे ।। 
भान वास्तवाचे ।
 साहित्यात ।।४।।

समता नि न्याय ।
ज्योत संघर्षाची ।। 
लेखनी भाऊंची । 
फकिरात ।।५।।

साहित्य सम्राट । 
वास्तवाची धार ।। 
लेखनीने वार ।
दंभावर ।।६।।

अण्णाभाऊंना मी । 
करितो नमन ।। 
करांनी वंदन । 
कोटी कोटी ।।७।।
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे 
जीवन गौरव पुरस्कार प्राप्त
         साहित्यिक
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
काँग्रेस नगर,अमरावती.
भ्र.ध्व. :८०८७७४८६०९.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या