प्रतिनिधी ✍️ राजैश येसेकर
चंद्रपूर : लोकसभा मतदारसंघाचा अथांग विस्तार आणि त्या तुलनेत मिळणारा अत्यंत अपुरा खासदार निधी यामुळे ग्रामीण भागातील विकासकामे खोळंबत असल्याने, महाविकास आघाडीच्या खासदारांनी खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तातडीने अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याबाबत मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.
सध्या खासदार निधीअंतर्गत वर्षाला केवळ 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होतो, जो एका मोठ्या मतदारसंघातील शेकडो गावांच्या विकास गरजा भागवण्यासाठी अत्यंत तोकडा पडत आहे. यामुळे स्थानिक पातळीवर रस्ते, पायाभूत सुविधा व इतर नागरी कामे करताना मोठ्या अडचणी निर्माण होत असून, राज्य शासनाने आपल्या विविध योजनांमधून लोकप्रतिनिधींना पुरेसा निधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे खासदारांनी निदर्शनास आणून दिले.
जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन विकास निधीच्या (DPDC) वार्षिक बजेटमधून 10 टक्के निधी खासदारांच्या शिफारशीनुसार देण्यात यावा,राज्याच्या अर्थसंकल्पातून सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन रस्ते / विकासकामे खासदारांच्या शिफारशीनुसार मंजूर करावीत, मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन कामे खासदारांच्या शिफारशीनुसार मंजूर करावीत, केंद्रीय मार्ग निधी (CRF) अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन रस्ते खासदारांच्या शिफारशीनुसार मंजूर करावेत राज्याच्या परंपरेनुसार बजेट अधिवेशनापूर्वी सर्व खासदारांची बैठक घेण्यात यावी.
या निवेदनावर खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार वर्षा गायकवाड, खासदार प्रणिती शिंदे, खासदार बळवंत वानखेडे आणि खासदार शामकुमार बर्वे यांच्या प्रमुख स्वाक्षऱ्या असून, लोकप्रतिनिधींच्या या रास्त मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून राज्य सरकारने यावर त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा खासदारांनी व्यक्त केली आहे.


0 टिप्पण्या