Ticker

6/recent/ticker-posts

झाडांना राखी बांधून सोईटच्या विद्यार्थ्यांनी जपले निसर्गाशी ‘रक्षाबंधन’चे नाते

‘वृक्ष वाचवा, पर्यावरण वाचवा’चा दिला संदेश; वृक्षसंवर्धनाचा विद्यार्थ्यांचा संकल्प! 

प्रतिनिधी ✍️ राजेश येसेकर

चंद्रपूर : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि रक्षणाच्या नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण निसर्गाशी असलेले नाते दृढ करण्याच्या अभिनव उपक्रमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोईट येथे साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील वृक्षांना राखी बांधून ‘वृक्ष वाचवा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश देत वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला.

रक्षाबंधनाच्या पारंपरिक संकल्पनेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत राबविण्यात आलेल्या या उपक्रमात इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून, झाडे ही केवळ निसर्गाची शोभा नसून मानवाच्या जीवनाचा आधार आहेत, ही भावना प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त केली.

या उपक्रमात आराध्या मडावी, कार्तिक पचारे, करण डोंगरे, मयूर झाडे, राधा सहस्त्रबुद्धे, श्रेया मडावी, राणी डोंगरे, श्रेया पचारे, पायल मडावी, फाल्गुन जवादे, शिवन्या शिवरकर, साक्षी पवार, विज्वेश्वरी डोंगरे, नंदिनी मडावी, पूनम सहारे, चांदणी शिवरकर, देवांशी मडावी, पलक पचारे, भव्य कुकडे, ऋषभ मरसकोल्हे, आराध्या मानकर, पौर्णिमा पवार, ऋतुजा पचारे, सृष्टी पचारे, दिपाली पचारे, शिवानी मडावी, रोहन चिंचुलकर व आर्यन देवतळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला.

‘ज्याप्रमाणे राखी बांधून आपण आपल्या भावाच्या रक्षणाची भावना व्यक्त करतो, त्याचप्रमाणे वृक्षांना राखी बांधून त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे,’ असा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला. झाडे आपल्याला प्राणवायू, सावली, फळे तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मोलाचे योगदान देतात. त्यामुळे वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करणे ही केवळ शासनाची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना पर्यावरणप्रेम, सामाजिक बांधिलकी, निसर्गाप्रती संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव प्रत्यक्ष कृतीतून देणारा हा उपक्रम ठरला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने वृक्षांना राखी बांधण्याची संकल्पना विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरली.

या उपक्रमासाठी मुख्याध्यापक उमेश शंकर आखाडे, शिक्षिका हेमलता दयाराम कौरती, विद्यार्थी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य लाभले. शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या