Ticker

6/recent/ticker-posts

महापुरुषांचे पेटंट !

    ऐतिहासिक महाभुतींवर लिहीणे वादग्रस्त झाले आहे.अशा विभुतींचे त्या त्या जाती धर्माचे लोकांनी पेटंट घेतलेले आहेत.इतिहास म्हणजे पुस्तकात वाचलेली माहिती.आपण स्वतः तर तेंव्हा नव्हतो.त्यामुळे लिहीलेल्या माहिती वर अवलंबून राहावे लागते.तर अशी माहिती अनेकांनी लिहीलेली असते.त्यात थोडाफार फरक असतोच.एकाच घटनेची माहिती अनेकांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून पाहून , वेगवेगळ्या काळात लिहीलेली असते.त्यात फरक पडतोच.आपण एक वाचतो.त्यावर लिहीले किंवा बोलले तर लगेच दुसरा आक्षेप घेतो.हे चुकीचे आहे.हे खोटे आहे.इतपत म्हणणे ठिक.पण लगेच भावना दुखू लागतात. नेमके दुखते कुठे ?डोक्यात कि छातीत कि पोटात कि कमरेत,तो संशोधनाचा विषय आहे. यांनी बदनामी केली.यांच्यावर गुन्हा दाखल करा.यांना जेलमध्ये टाका.असे मोर्चे काढले जातात.पोलिसात तक्रारी वगैरे वगैरे.अब्रूचे खटले,मानहानीचे दावे वगैरे वगैरे.पुढे काळा कोट आणि पिवळा न्याय.घरच्या भाकरी कोर्टात खाय!
    एखादी माहिती चुकीची आहे.ती वाचून कोणी त्या आधारावर बोलले तर बुद्धीमान,ज्ञानी,शहाणा माणूस ती चूक दुरुस्त करतो किंवा करायला सांगतो.पण येथे तर निर्बुद्ध लोक सरळ दंगा करतात, मोर्चा काढतात, फोटो वर चप्पल मारतात.हा काय प्रकार आहे?काही समाजकंटक भाड्याने टाळकी पुरवतात.देशभक्त मंत्री टोळकी भाड्याने घेतात.टाळकी भाड्याने देणाऱ्यांचे बंगले,गाडी,थाटमाट पहा. असा रोजगार हमीच्या कार्यक्रम तर रोज चालू आहे.हे चुकीचे आहे,असे कोणी म्हणत नाही.उलट शोधतात,बरेच दिवस झाले, आंदोलन झाले नाही, काहीतरी विषय शोधा.आपली माणसे रिकामी बसली आहेत.बरेच दिवस झाले,पेपरला फोटो नाही.असे रिकामटेकडे लोकांच्या संघटना तयारच असतात.या वादाला,या त्रासाला टाळण्यासाठी सुज्ञ माणसे इतिहास वर , ऐतिहासिक व्यक्ती वर लिहीत नाही, चर्चा करीत नाही.कारण एकतर आपण ही वाचून किंवा ऐकूणच बोलतो.समोरचा ही वाचून किंवा ऐकूणच बोलतो.दोघांना खरे काय ते माहीत नसते.आणि ते रस्त्यावर येऊन धुडगूस घालतात.हा खरा कि तो खरा ,अशी दोघांना ,पोलिसांना,न्यायाधिशांना ही खात्री नसते.तर मग न्याय कोण देणार?खरे कोण सांगणार? निर्बुद्ध, रिकामटेकडे, भाडोत्री?दगड,वीटा,शाई?
     भाषणात सांगितले जाते,अमुक अमुक व्यक्ती देशाचे होते,राष्ट्राचे होते.पण त्यांचेविषयी काही थोडेफार चुकीचे बोलले गेले कि लगेच ते एका जातीचे किंवा जमातीचे होतात.त्या त्या जातीने त्या महापुरुषाचे अनधिकृत पेटंट घेतलेले असते.मग ती जात जमात रस्त्यावर उतरून धुडगूस घालते.घरी भाऊ,बायको,पोरं, शेजारी ऐकत नाहीत,आणि हे चालले कलेक्टर ला सांगायला.म्हणे यांच्यावर गुन्हा दाखल करा.चालले एसपी ला सांगायला,म्हणे याला ताबडतोब जेलमध्ये टाका.तो कलेक्टर,तो एसपी सुद्धा त्यांच्या कामातून कंटाळलेला असतो.त्याला वसुली चे टार्गेट पुरे करायचे असते.तिकडून मंत्री दम भरतो.म्हणून तो ही म्हणतो,कारवाई करा आणि या मोर्चा वाल्यांचे समाधान करा.लगेच दुसऱ्या दिवशी बातमी, फोटो.याला अटक,त्याला मटक.अमुक अमुक संघटनेचा विजय असो.
     महाराष्ट्रात अनेक वादग्रस्त विषय सामाजिक व राजकीय विद्यापीठात शिकवले जातात.राहूल गांधी, चंद्रकांत पाटील, लोढा,राऊत, गुलाबराव अशी माणसे काहीतरी बोलून गेले.खरे कि खोटे त्यांनाही कळले नाही.वाचाळांनी उचलली जीभ लावली टाळ्याला .तसा वात्रटांनी उचलला दगड ,मारला टाळक्यात.यात महापुरुषांची आणि महिलांची नांवे मी मुद्दाम टाळली.लिहीतांना,छापताना कानामात्रा ,विलांटी ,अनुस्वार , स्वल्पविराम चुकला किंवा राहून गेला तर त्याच महिला मला पुर्णविराम द्यायला मोर्चा काढतील.ईश्वराच्या कारखान्यातून प्रत्येक माणसाला,बाईला डोके लावलेले असते किंवा डोक्यासारखे मानेवर खोके ठेवलेले असते.डोके हेच बॉडीची मुख्य असेसरी असते. पण जेंव्हा हे गर्दी करतात तेंव्हा ते डोके सुद्धा राहात नाही.गर्दीला डोके नसते.नव्हे, मुद्दाम डोके नसलेली माणसे या कामी बोलवली जातात.एकदा मी लिहीले होते कि शिक्षण संपले ,वयात आले कि मुलगा ,मुलींची लग्न करावीत.जेष्ठ नागरिक होईपर्यंत अविवाहित ठेवू नये. तर पुरूषांना बरे वाटले होते. महिलांनी तर पोलिस स्टेशनमध्ये मोर्चा नेला होता.म्हणे हा थेरडा महिलांच्या अविवाहित राहाण्यास विरोध करतो.मी माफी मागितली कि,चुकले माझे.मी असे म्हणायला नको होते.पुरूषांनी पुरूषांशी लग्न करावे.असे म्हणून माझी चूक दुरुस्त केली.समलिंगी विवाह करणे सरकारने सक्तीचे केले तरी मी आक्षेप घेणार नाही.अशीही पुष्टी जोडली.तशी शक्यता वाढलीच आहे.अनेक मंत्री ,साधू अविवाहित आहेत.कदाचित ब्रम्हचारी असू शकतील.खरे खोटे तेच जाणोत.

.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या