Ticker

6/recent/ticker-posts

स्त्री रोग तज्ञाची नियुक्ती लाखनीत मात्र कर्तव्य भंडार्‍यात


ग्रामीण रुग्णालय लाखनी येथील प्रकार

स्त्री रोगतज्ञाअभावी रुग्णांची गैरसोय 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा:- आरोग्य सेवा हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. सर्वांना आरोग्य सेवा मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून शासनाने आरोग्य विषयक धोरण आखले आहे. मात्र लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवेचा बोजवारा  उडाला आहे. येथे मागील दीड वर्षापासून स्त्री रोग तज्ञाची नियुक्ती केली गेली असली तरी त्या सामान्य रुग्णालय भंडाऱ्यात कर्तव्य बजावत असल्यामुळे स्त्रीरोग तज्ञाअभावी रुग्णांची गैरसोय होत आहे. स्त्रीरोग तज्ञांची प्रती नियुक्ती रद्द करावी. अशी मागणी होत आहे.  
          तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहचावी. या करिता शासनाकडून २६ आरोग्य उपकेंद्र, ६ आयुर्वेदिक दवाखाने, ५ प्राथमिक आरोग्य केंद्र व २ ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहेत. यातून दारिद्र्य रेषेखालील व गरीब कुटुंबांना नाममात्र शुल्क आकारून आरोग्य सेवा पुरविली जाते. लाखनी ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत असून हे रुग्णालय तालुका स्तरावर असल्यामुळे याठिकाणी बालक, महिला व ज्येष्ठ नागरिक यासारखे रुग्ण उपचारास येतात. या ठिकाणी रुग्णवाहिकेसह आवश्यक ते वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक आवश्यक असल्यास संबंधित रुग्णावर योग्य ते उपचार केले जात नाही. पण एखाद्या रोगाची विषयतज्ञ वैद्यकिय अधिकारी नसल्यास "रेफर टू भंडारा" ची नामुष्की ओढवते. 
          ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे माता व बाल संगोपन  योग्य रीतीने व्हावे. या करिता दीड वर्षापूर्वी एका महिला वैद्यकिय अधिकाऱ्याची स्त्रीरोग तज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली. पण लगेचच प्रतिनियुक्तीवर सामान्य रुग्णालय भंडारा येथे कर्तव्य बजावण्याचे आदेश आल्यामुळे वेतन लाखनीतून तर कर्तव्य भंडाऱ्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महिला रुग्णांच्या प्रकृती विषयक अडचणी तसेच प्रसूतीसाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. लाखनी हे तालुक्याचे ठिकाण असून शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे नेहमीच अपघात होत असतात. तसेच बाह्यरुग्ण विभागात रोज २०० ते २५० रुग्ण उपचाराकरिता येतात. त्यात निम्यापेक्षा अधिक महिला असतात. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे अशक्यप्राय बाब होते. महिला रुग्णांच्या गैरसोयीचा विचार करून या स्त्री रोज तज्ञाची प्रतिनियुक्ती रद्द करून ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे नियमित सेवा देण्याची मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या