गावचे निवडणूक झाले ग्लोबल
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :-लाखनी तालुक्यातील ग्रामीण परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांचा पारंपरिक प्रचाराबरोबरच हायटेक प्रचारही जोमात सुरू आहे. या प्रकाराने दरवेळी गावच्या चौकाचौकात होणाऱ्या निवडणुक विषयक चर्चांची जागा हायटेक प्रचाराने घेतली आहे. त्यामुळे गावात घरोघरी फिरून व भेटीगाठी घेऊन केला जाणारा प्रचार आता सामाजिक माध्यमातूनही सुरू असल्याचे चित्र गावागावात दिसत आहे.
प्रचाराने गावच्या सीमा ओलांडल्या
तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुका येत्या १८ डिसेंबरला होत आहेत. निवडणूकीचा दिवस जसजसा जवळ येउ लागला आहे. तसतसा ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत रंगत वाढत आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही त्याच गावापूरतीच अवलंबून असते. मात्र आता सोशल मिडिया मार्फत व्हॉटस अँप,फेसबुकमुळे गावपातळीवर प्रचार न राहता संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात पोहचत आहे. त्यामुळे उमेदवारांकडून सोशल मीडियाचा पुरेपूर वापर सुरु आहे.त्यामुळे हा प्रचार एका गावा पुरता मर्यादीत राहिलेला नाही.
अन् ....प्रचार सुरु झाला
बुधवारी निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले.त्यामुळे बुधवार पासूनच उमेदवारांनी हायटेक प्रचाराला सुरुवात केली आहे. सोशल मिडियाच्या व्हॅटसअँप,फेसबुक इन्स्टाग्रामवर,फोटो व्हिडिओ क्लिप,तसेच उमेदवारांनी मागील पाच वर्षांमध्ये केलेली विकासकामे,आणि प्रचाराच्या पोस्ट टाकण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान,उमेदवारांनी वैयक्तिक व प्रभागातील उमेदवारांचे एकत्र डिझाइन तयार करत असून सोशल मिडियावर अपलोड करत आहेत.
*पाड्यावर नव्हे सोशल मिडायावर गप्पा*
गावातील निवडणूकांसाठी व्हॉटसअप महत्वाचे प्रचार साधन झाले आहे. ग्रामपंचायत निवडणूका आल्या म्हणजे गावातील पाड्यावरच्या चर्चा आणि चहांच्या टपऱ्यांवर चर्चांना उधाण यायचे मात्र, यंदा लोकसभा, विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, निवडणुकी प्रमाणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत रंगत आहे. गावपातळीवरील तंटे, लोकांमधील नाराजी, नाराजी दूर करण्यचे प्रयत्न, घरोघर रंगणारे रुसवे फुगवे याची जाहीर चर्चा आता सोशल मिडियावर होउ लागली आहे.


0 टिप्पण्या