सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894
परभणी : जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीसह आवारातच विविध पक्ष, संघटना, संस्था व प्रतिष्ठानांच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी विविध विषयांच्या अनुषंगाने नानाविधी प्रकारची आंदोलने सुरु केल्याने विविध विभागांतर्गत अधिकारी कर्मचारी अक्षरशः हादरले आहेत.
मध्यवस्तीतच जिल्हा परिषदेद्वारे बहुमजली व सुंदर अशी इमारत उभारण्यात आली. या भव्य इमारतीत जून्या जागेतून जिल्हा परिषद कार्यालय जिंतूर रस्त्यावरून स्थलांतरीत होणार असे अपेक्षित असतांना कोरोनाची लाट आली. अन् या भव्य इमारतीत जिल्हा प्रशासनाने कोविड केअर सेंटर सुरु केले. त्यामुळे तब्बल दोन वर्ष जिल्हा परिषदेस नूतन इमारतीत प्रवेश करण्याकरीता प्रतिक्षा करावी लागली. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर या भव्य इमारतीत एक एक करत जवळपास सर्व विभाग स्थलांतरीत झाले, स्थिरावलेसुध्दा. त्या पाठोपाठ या इमारतीत शासकीय अधिकारी, कर्मचार्यांबरोबर सर्वसामान्य नागरीक व विविध पक्ष, संस्था, संघटना, प्रतिष्ठानांच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली. सहाजिकच या अनुषंगाने विविध विषय, प्रश्न, समस्यांच्या अनुषंगाने आंदोलनेसुध्दा सुरु झाली. दुर्देवाने आंदोलनकर्त्यांनी मुख्य इमारतीतच, आवारातच ठाण मांडून आंदोलने सुरु केली. या आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची वरिष्ठ अधिकार्यांनी दखल घेतली खरी, परंतु, या आंदोलनकर्त्यांनी मुख्य इमारतीतच, आवारातच केलेल्या आंदोलनासह नानाविधी क्लूप्त्यांकडे वरिष्ठ अधिकार्यांनी साफ दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम असा, आता कोणीही असो, आंदोलनकर्ते थेट मुख्य इमारतीतच, आवारातच धडकून आंदोलने करु लागली आहेत. हे प्रकार वाढले असून त्यामुळे जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभागातील अधिकारी - कर्मचारी अक्षरशः हादरले आहेत, अस्वस्थ झाले आहेत. कारण आंदोलनकर्ते मुख्य इमारतीतच ठाण मांडून घोषणाबाजी करुन ठिय्या मांडू लागले असून त्यामुळे दैनंदिन शासकीय कामकाजावर त्याचे परिणाम उमटू लागले आहेत. संपूर्ण जिल्हा परिषद इमारतच आंदोलनकर्त्यांनी वेठीस धरल्याचे चित्र दिसू लागले आहे.
जिल्हा परिषदेच्या आतापर्यंतच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी या आंदोलनकर्त्यांच्या आंदोलन स्थळांकडे साफ दुर्लक्ष केले. परंतु, नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी यात तातडीने दखल घेवून आंदोलनकर्त्यांना इमारतीबाहेर जागा निश्चित करुन द्यावी, असा सूर उमटत आहे. जिल्हाधिकारी सौ.आंचल गोयल यांनीही याकडे लक्ष द्यावे, असे मत जागरुक नागरीक व्यक्त करीत आहेत.


0 टिप्पण्या