सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमांतर्गत गुरुवार दि. 1 डिसेंबर रोजी परभणी तालुक्यातील मौजे मांडाखळी या गावास भेट दिली व ग्रामस्थांबरोबर हितगूज केले. तसेच मार्गदर्शनही केले.
कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांच्या सुचनेनूसार आणि संचालक विस्तार शिक्षण डॉ. देवराव देवसरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रारंभी अशोक राऊत यांच्या घरी शेतकरी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. जया बंगाळे यांनी दैनंदिन जीवनातील ताणतणाव पेलून आनंदी जीवन कसे व्यतीत करावे याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तद्नंतर प्रा.निता गायकवाड यांनी बालकांची आणि किशोरावस्थेतील काळजीसाठी आवश्यक बाबी नमूद केल्या आणि उपस्थिताना यासंबधीचे लिखित साहित्य वितरीत केले. तसेच पोषणबाग निर्मितीसाठी महाविद्यालयाच्या वतीने बियाणे कीटचे वाटप करण्यात आले. याबरोबरच महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी शेतीस जोडधंदा म्हणून शिलाई काम करत असलेल्या बळीराजाच्या घरी भेट दिली या ठिकाणी डॉ. इरफाना सिद्दिकी यांनी शिलाईकामामधील महत्वाच्या बाबी तसेच शिलाई मशीनची योग्य हाताळणी बाबत उपयुक्त मार्गदर्शन केले.
यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट देवून डॉ. जया बंगाळे यांनी विद्यार्थ्याना दैनंदिन जीवनात आचरणात आणावयाच्या चांगल्या सवयींचे महत्व सांगून उपस्थित विद्यार्थ्याना मनोरंजनात्मक कार्याद्वारे मार्गदर्शन केले यास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यासाठी मुस्तफा शेख प्रभारी मुख्याध्यापक, प्रतापसिंग नाईक यांच्यासह सर्व शिक्षकवृंदाचे सहकार्य लाभले.
याबरोबरच डॉ. शंकर पुरी यांनी शेती व्यवसायासाठी माहिती तंत्रज्ञाचा वापर याबाबत मार्गदर्शन केले. त्यासाठी विद्यापीठाचे विविध अॅप्स बाबत माहिती देत त्या अॅप शेतकर्यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉलेशन करून त्याची उपयुक्तता पटवून दिली. सोबतच सीताफळ पिक लागवडीबाबत चर्चा केली. यानंतर शिवार फेरी घेऊन रमेश जनार्धन राऊत यांच्या सीताफळ बागेस तर दिवाकर नामदेव राऊत यांच्या शेड नेट/हरितगृहातील (हायटेक) फुलशेती प्रकल्पास आणि स्वराज्य ग्रो शेतकरी बचत गट अवजार बँकेस भेट दिली.
या कार्यक्रमात शेतकर्यांशी संवाद करत त्यांचा कौटुंबिक तसेच शेतीव्यवसायाशी निगडीत संपूर्ण माहिती संकलित केली व त्यांच्या अडचणी समजून घेतल्या तसेच त्यांचा अडचणी आणि अपेक्षाशी निगडीत सोडवणूक करण्यासाठी विद्यापीठाचे तंत्रज्ञानाच लाभ घ्यावा, शास्त्रज्ञाच्या संपर्कात राहावे. तसेच विद्यापीठाचे विविध अॅप्स तसेच सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाचा महिला शेतकर्यांसाठी तंत्रज्ञान या विशेष पचा उपयोग करावा, गावामध्ये एक सहकारी तत्वावर संगणकीय सुविधा केंद्र उभारावे. तसेच दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन व स्वास्थ्यपूर्ण जीवनशैली अंगिकारण्याचे सूचित केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रगतशील शेतकरी रमेश जनार्धन राऊत, अशोक राऊत, धनंजय सोनटक्के, मधुकर राऊत, शिवाजी कन्हे, शिवाजी शिळवने यांच्यासह महाविद्यालयातील प्रसाद देशमुख आणि राम शिंदे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमामध्ये तीस शेतकरी महिला व बांधवांनी सहभाग नोंदविला.


0 टिप्पण्या